अनेकदा सार्वजनिक ठिकाणी महिलांबरोबर अत्याचार घडताना दिसतात. बऱ्याचदा मुली वा महिलांची छेड काढली जाते. आता She आणि आश्रम या वेब सीरिजमधून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री अदिती पोहनकरने तिच्याबरोबर कोणत्या घटना घडल्या होत्या, याबद्दल वक्तव्य केले आहे. याबरोबरच ज्यावेळी तिच्याबरोबर असे काही घडले, तेव्हा तिने काय केले होते, याचा खुलासा केला आहे.

तो मला त्याच्या बॅगेतून…

अदिती पोहनकरने नुकतीच हॉटरफ्लाय(Hauterrfly) या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने शाळेत असताना आणि एकदा एका लोकल ट्रेनमध्ये घडलेली घटना सांगितली. अदितीने या मुलाखतीत तिच्याबरोबर घडलेल्या घटनांबाबत खुलासा केला. अदिती म्हणाली, “माझी आई CAICWA मध्ये शिक्षिका होती. आमची सोसायटीची एक बस होती. चौथीपर्यंत ती बस शाळेतून घरी सोडायची. पण पाचवीपासून स्वत:च्या वाहनानं / बसनं जावं लागत असे. एक मुलगा होता, जो माझ्या आईचा विद्यार्थीही होता. तो मला त्याच्या बॅगेतून काहीतरी दाखवायचा प्रयत्न करीत होता. मी ते पाहावं यासाठी तो मला इशारा करीत होता. मी पाहिलं आणि काय प्रतिसाद द्यायचा हे न समजून मी हसले. मी त्याला दादा म्हणायचे.

मी त्याच्या डोळ्यांत पाहिलं. मला त्याचा हेतू समजला. मी बसमध्ये उभी राहिली आणि मोठ्यानं म्हणाले की, हा माणूस मला काहीतरी चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मी हे खूप मोठ्यानं आणि स्पष्टपणे म्हटलं. त्याला धक्का बसला. तो त्याच्या पँटची चेन लावणं विसरला. तो घाबरला होता. बस थांबली नाही. त्याची पँट खाली पडली. त्यानं चालत्या बसमधून खाली उडी मारली. मी घरी गेल्यावर आईला घडलेला सगळा प्रकार सांगितला. तिनं मला शाबासकी दिली आणि सांगितलं की, परत कोणी असं केलं, तर दंगा कर. एकटी जाऊन लोकांना मारू नको.”

दुसरी घटना सांगताना अभिनेत्रीने म्हटले, “मी अकरावीमध्ये असेन. मी लोकल ट्रेनमधून प्रवास करीत होते. महिलांचा जो डबा असतो, तिथे शाळेच्या गणवेशातील १८ वर्षांखालील शाळेच्या मुलांना येण्यास परवानगी होती. ते तेथील खांबाला धरून उभे राहत असत. तर, दादर असं कोणतं तरी स्टेशन होतं. सकाळचे ११. ३० किंवा १२ वाजले असतील. जशी त्या स्टेशनवरून ट्रेन चालू झाली, तर तिथे उभ्या असलेल्या मुलानं माझ्या स्तनांना धरलं. मी त्या दिवशी कुर्ता घातला होता. त्याचा काय हेतू होता, याची मला जराशीही कल्पना नव्हती.

जेव्हा त्यानं तो प्रकार केला, त्यावेळी मला थोडासा धक्का बसला. मी पुढच्या स्टेशनवर उतरले आणि मी एका पोलिसाजवळ गेले. त्यानं मला म्हटलं की, ठीक आहे. जास्त काही झालं का? त्या मुलाला आता कुठे शोधणार? विश्वास बसणार नाही; पण ज्या मुलानं माझ्याबरोबर तो प्रकार केला होता, तो तिथेच उभा होता. पोलिसांना मी सांगितलं. तर, त्यांनी मला विचारलं की, तुझ्याकडे काय पुरावा आहे? मी म्हणाले की, मी सांगतेय. मी खोटं कशाला बोलू? मग एक महिला पोलीस माझ्याबरोबर आली. तिनं त्याला विचारलं की, तू हिला काही केलंस का? तर तो नाही म्हणाला. मी जोरात ओरडले. त्याला खरं सांग म्हणाले. जेव्हा मी त्याला भीती दाखवली, तर तो माफ कर म्हणाला. मी त्याला म्हणाले की, यांच्यासमोर सांग की, तू परत असं काही करणार नाहीस.”

दरम्यान, आदिती पोहनकरचे आश्रम या वेब सीरिजच्या तिसऱ्या भागातील कामासाठी कौतुक झाले. अभिनेत्री लवकरच नेटफ्लिक्सच्या ‘मंडल मर्डर्स’मध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये वाणी कपूर, सुरवीन चावला, वैभव राज गुप्ता व श्रेया पिळगांवकर महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.