अपूर्वा नेमळेकर

माझं नॅशनल कॉलेज वांद्रे आणि त्यानंतर रुपारेल कॉलेज अशा दोन ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं. कॉलेजमध्ये असताना पूर्णपणे अभ्यासाकडेच लक्ष होतं. रुपारेलमध्ये बरेचसे कलाकार घडले आहेत. पण मला अभिनयाचा श्रीगणेशा तिथे करता आला नाही. बीएमएस करत असल्यामुळे इतर उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला वेळच मिळायचा नाही.

अकरावी आणि बारावीचं शिक्षण मी नॅशनल कॉलेजमध्ये घेतलं. तिथे नुकतीच दहावी पास होऊन आलेली मुलगी असल्यामुळे तिथल्या सांस्कृतिक वातावरणाशी जुळवून घेणं कठीण होतं. पण तिकडे कॉलेज फेस्टिव्हलमध्ये ‘वन अ‍ॅक्ट प्ले’ नावाचा कार्यक्रम असायचा. त्यात काही वस्तू दिल्या जायच्या, काही संवाद दिले जायचे आणि दोन कलाकारांची निवड होते. तर आपल्याला देण्यात आलेल्या या गोष्टींमधून नवं काही तरी निर्माण करायचं असायचं. या कार्यक्रमामुळे सर्जनशीलतेला चालना मिळाली. मी कॉलेजमध्ये नवीन असल्यामुळे यात भाग घ्यायचे. एकदा आमचा ‘वन अ‍ॅक्ट प्ले’मध्ये पहिला क्रमांक आला होता. या कार्यक्रमामुळे माझी ओळख विद्यार्थ्यांमध्ये झाली. याच कार्यक्रमात माझ्यातला अभिनयाचा पैलू माझ्या मित्र-मैत्रिणींना दिसला होता. आणि मलाही तो दिसला होता. आपण हे करू शकतो, याची जाणीव झाली होती. त्याच वेळी मला एका मालिकेसाठी विचारणा झाली होती. पण मी ती नाकारली. त्यानंतर माझं महाविद्यालय बदललं. मी रुपारेलला आले. मग अभ्यास एके अभ्यास सुरू झाला. परंतु तरीही कला क्षेत्राशी निगडित उपक्रमांमध्ये काहीना काही खारीचा वाटा उचलायचे. जे नाटकात काम करायचे, महोत्सवांमध्ये भाग घ्यायचे, त्यांच्या मदतीला मी जायचे. त्यानिमित्ताने माझं निरीक्षण सुरू व्हायचं. नाटकात काम करणाऱ्या मुलींना पाहून संवाद सादर करताना आवाजातील चढ-उतार कसा ठेवायचा. ‘बॉडी लँग्वेज’चा वापर कसा करायचं, ते मला कळू लागलं. कॉलेजमध्ये केलेलं हे निरीक्षण अभिनय क्षेत्रात आल्यावर कामी आलं. त्याच वेळेस मी नाटकांमध्येही भाग घेतला असता, तर अभिनयात त्याचा अधिक फायदा झाला असता, असं आता मला वाटतं.

कॉलेजमध्ये असताना अभिनय नाही, पण नौटंकी खूप केली होती. त्या वेळीच नेमका अभिनेत्री करीना कपूरचा ‘जब वी मेट’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आणि मी स्वत:ला त्या चित्रपटातील करीनाच्या गीत या पात्राच्या ठिकाणी आहे असं समजून गीतसारखेच हावभाव करत कॉलेजमध्ये वावरायचे. एकदा कॉलेजची पिकनिक गेली होती, तेव्हाही मी गीतच्या व्यक्तिरेखेत शिरून तसे संवाद सगळ्यांना ऐकवले होते. त्यामुळे माझे मित्र-मैत्रिणी मला तू गीतसारखीच आहेस, तू पुढे जाऊन अभिनयातच करिअर कर असे सांगायचे. पण मी त्यांना उडवून लावायचे. म्हणूनच त्यांना मी मालिकेत काम करतेय असं सांगितलं तेव्हा आश्चर्य वाटलं नाही. अभिनयाची संधी चालून आल्यावर आई-वडिलांनी ती संधी दवडू नकोस असं सांगितलं.

पदवीचं शिक्षण पूर्ण होत असतानाच मला ‘आभास हा’ मालिकेतील आर्या नावाच्या मुख्य नायिकेच्या व्यक्तिरेखेसाठी आयरिश निर्मिती संस्थेकडून विचारणा झाली. ती व्यक्तिरेखा माझ्याच वयोगटातल्या मुलीची असल्यामुळे मी होकार दिला. परंतु पहिलीच संधी असल्यामुळे दैनंदिन मालिकांचं चित्रीकरण कसं होतं, किती वेळ त्याला द्यावा लागतो, कशा पद्धतीने काम करायचं असतं, याविषयी मला काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे निर्माते विद्याधर पाठारेंनी मला त्यांच्या त्या वेळी सुरू असलेल्या ‘लज्जा’ आणि ‘पुढचं पाऊल’ या दोन मालिकांच्या सेटवर काही वेळ घालव, तिथे निरीक्षण कर, कशा प्रकारे कलाकार काम करतात ते पहा असं सांगितलं. मग मी ‘आभास हा’ मालिका सुरू होण्याआधी एक महिनाभर सेटवर गेले होते, तिथे जाऊन चित्रीकरण बघायचे. त्यानंतर दिग्दर्शक प्रतिमा कुलकर्णी यांनी मला आठवडाभर अभिनयातील बारकावे शिकवले. त्यांना मी आजही गुरू मानते.

मला माझं इथलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून एमबीए करण्यासाठी लंडनला जायचं होतं. पण अभिनय क्षेत्राचं बोलावणं आलं. तसं झालं नसतं तर एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये असले असते. किंवा मार्केटिंगमध्ये करिअर केलं असतं. कॉलेजमध्ये असतानाची एक आठवण अशीही आहे की, माझं हस्ताक्षर चांगलं असल्यामुळे फलकलेखन, जाहिरात वगैरे लिहायची असायची तेव्हा सगळे मला बोलवायचे. कॉलेजमध्ये फेस्टिव्हल्समध्ये लिहिण्याची कामं माझ्याकडे यायची. त्यामुळे अशा प्रकारे मी सहभाग नोंदवायचे.‘आभास हा’ या मालिकेनंतर मी इतर काही मालिकांमध्ये काम केलं, काही चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर मी चांगल्या भूमिकेच्या शोधात असताना ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात शेवंताची व्यक्तिरेखा करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर सध्या मी दोन हिंदी चित्रपट केले आहेत आणि एका नेटफ्लिक्सच्या वेबसीरिजमध्येही काम करतेय. तसंच पाच भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणाऱ्या एका चित्रपटातही काम करतेय. मला पेंटिंग आणि स्केचेस करायला आवडतं. शेवटी सांगेन की संयम ठेवा. कारण या क्षेत्रात आज काम आहे, तर उद्या नाही. स्वत:वर विश्वास ठेवा.

शब्दांकन : भक्ती परब