चित्रपटाचा खेळ रद्द करू पाहणाऱ्या सिनेमागृह चालकांना इंगा; अभिनेत्री अश्विनी कासारची तत्परता

रसिक प्रेक्षकांच्या गैरसोयीच्या वेळी ठेवण्यात आलेला मराठी चित्रपटाचा खेळ अपुऱ्या प्रेक्षकसंख्येचे कारण देऊन रद्द करू पाहणाऱ्या एका मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाला मराठमोळी अभिनेत्री अश्विनी कासारच्या प्रसंगावधानाने चांगलाच धडा शिकवला. दहापेक्षा कमी प्रेक्षक असल्याने ‘नियमानुसार’ हा खेळ रद्द करावा लागेल, असे व्यवस्थापनाने सांगताच अश्विनीने ताबडतोब आपल्या मित्रमंडळींशी संपर्क साधून त्यांना पाचारण केले आणि अवघ्या १२ प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहाला खेळ दाखवावा लागला.

गेल्या काही वर्षांमध्ये येत असलेले दर्जेदार मराठी चित्रपट राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांत आपली छाप पाडत आहेत. तिकीटबारीवरही काही चित्रपटांनी कोटींच्या घरात कमाई केली आहे. परंतु, बहुपडदा चित्रपटगृहांच्या (मल्टिप्लेक्स) व्यवस्थापनांकडून मराठी चित्रपटांना मिळणारी दुय्यम वागणूक अद्याप कायम आहे. बहुतांश मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांचे खेळ आडवेळी अर्थात प्रेक्षकांच्या गैरसोयीच्या वेळी ठेवण्यात येतात. त्यामुळे प्रेक्षक या खेळांना मुकतात. दुसरीकडे, सुमार दर्जाच्या हिंदी चित्रपटांचे खेळ मात्र मोक्याच्या वेळी ठेवून तिकडे गर्दी खेचण्याचे प्रयत्न केले जातात. असाच प्रकार अंबरनाथमधील बिग सिनेमागृहात बुधवारी घडला. परंतु, बदलापूरकर अभिनेत्री अश्विनी कासार हिने प्रसंगावधान दाखवत चित्रपटगृह व्यवस्थापनाला माघार घ्यायला लावली.  या सिनेमागृहात बुधवारी रात्री साडेदहा वाजता ‘हृदयांतर’ या चित्रपटाचा खेळ ठेवण्यात आला होता. आठवडय़ातील कामाचा दिवस आणि रात्री साडेदहाची आडवेळ यांमुळे या खेळाला प्रेक्षक अजिबात नव्हते. त्यामुळे व्यवस्थापनाने हा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री अश्विनी कासार हिने आपण या ‘शो’ला येत असून तो रद्द करू नये, अशी विनंतीही व्यवस्थापनाला केली. परंतु, दहापेक्षा कमी प्रेक्षकसंख्या असेल तर खेळ रद्द करावा लागेल, असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले. व्यवस्थापनाची ही ताठर भूमिका पाहून अश्विनीला एक कल्पना सुचली. हा खेळ पाहण्यासाठी तिच्यासह तिच्या कुटुंबातील पाचजण प्रेक्षक होते. मग तिने आपल्या काही मित्रांशी संपर्क साधून त्यांनाही चित्रपट पाहण्यासाठी पाचारण केले. ‘माझ्या काही मित्रांनी तातडीने चित्रपटगृहाकडे धाव घेतली. कुटुंबातील पाचजण आणि अन्य मित्रमंडळी असे आम्ही १२ प्रेक्षक येथे जमलो. त्यानंतर आम्ही व्यवस्थापनाला विनंती केली व रात्री साडेदहानंतर चित्रपटाचा खेळ सुरू झाला,’ असे अश्विनीने सांगितले.

‘प्रेक्षकांअभावी मराठी चित्रपटांचे असे खेळ रद्द होणे ही बाब दुर्दैवी आहे. परंतु, आमच्या मागणीला प्रतिसाद देत खेळ सुरू ठेवणाऱ्या व्यवस्थापनाचेही आभार,’ असे सांगत अश्विनीने या प्रकरणावर पडदा टाकला.

नेहमीच दुजाभाव

या सर्व प्रकारामुळे मराठी चित्रपटाच्या खेळांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वेळी-अवेळी खेळ ठेवल्यामुळे चांगल्या मराठी चित्रपटांना प्रतिसाद मिळत नाही, त्यातून मराठी चित्रपटसृष्टीला नुकसान सोसावे लागत असल्याचे अनेक चित्रपटांच्या बाबतीत समोर आले आहे. सध्या गाजत असलेला ‘रिंगण’ चित्रपटही अवेळी खेळ ठेवल्याने प्रेक्षकांच्या प्रतिसादाला मुकला आहे. सध्या फक्त ठाणे शहरात एका ठिकाण्??ाी या चित्रपटाचे प्रदर्शन सुरू आहे.