तेजश्री प्रधान- आमच्या डोंबवलीच्या घरी मी अगदी लहानपणापासून गोकुळाष्टमीची रात्रौ बारा वाजता होणारी पूजा पाहत आले आहे. त्यावेळी होणारे विष्णूसहस्त्रनाम व दूध-दही-चणे-फुटाणे याचा केला जाणारा नैवेद्य हे सगळ कसे भावूक आहे. खरंच खूप बरे वाटते. आमच्या घरी श्रावण महिना पाळला जातो. शुक्रवारी आम्ही देवीला वाण देतो, माझी आई त्या दिवशी गोडाच्या पु-या करते. त्याशिवाय, हरब-याची उसळदेखिल केली जाते. डोंबिवली प्रामुख्याने हिंदू धर्माचे सण, परंपरा, मूल्ये यांची जपणूक करणारे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे, येथे अनेक सण घरगुती व सार्वजनिक अशा दोन्ही स्वरुपात उत्तमरित्या साजरे होतात. मुंबईत गोपाळकाल्याला आलेल्या स्वरुपाबाबत मी काय बोलणार? प्रत्येक वर्षी दहीहंडी फोडताना दोघा-तिघा गोविंदाना होणारी जिवघेणी इजा पाहून मात्र धस्स होते. इतक्या उंचीवरील दहीहंडी फोडायचा प्रयास का, यापेक्षा तरी इतक्यावर लावताच का? आणि तरी फोडण्यासाठी पंधरा-सतरा वर्षाच्या मुलाने चढण्यापूर्वी आपल्या माता-पित्याचा विचार आवर्जून करावाच

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिया पाटील- गोकुलाष्टमी निमित्ताने मला आवर्जून सांगावेसे वाटते की आपला श्रीकृष्ण मोठा व्हावा. तो अशा अर्थाने मोठा व्हावा की, त्याने आज सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली बजबजपुरी-अशांतता-गोंधळ संपुष्टात आणावा. गोकुळाष्टमी सणाचे पावित्र्य कायम राहण्याचीही गरज आहे. दुस-या दिवसाच्या गोपालकालास आलेले व्यावसायिकीकरण मला अजिबात मंजूर नाही. विशेषतः आमच्या मंडळाची दहीहंडी अन्य मंडळाच्या दहीहंडीपेक्षा उंच व जास्त रकमेच्या बक्षिसाची अशी स्पर्धा या सणाचे गांभिर्यच हरवून टाकणारे आहे. गेल्या काही वर्षात या गोपालकालाच्या निमित्ताने आम्हा चित्रपट अभिनेत्रींना मोठ्याच प्रमाणात नृत्यासाठी बोलावले जाण्याचे “फॅड”  वाढले आहे. मी त्याकडे एक व्यावसायिक संधी म्हणून पाहते. पण, काही ठिकाणी आम्हा तारकांना पूजेसाठीदेखिल बोलावले जाते. मी पुणे शहारात हुजरपागा येथील हॉस्टेलमध्ये असताना श्रीकृष्णजयंती व गोपालकाला या सणांचे महत्व जाणून घेवू शकले. कारण आमच्या सांगलीत अन्य सणांचे महत्व खूप आहे.

मीता सावरकर- श्रावण हा अनेक कारणास्तव माझा आवडता महिना आहे. अगदी थेट सांगायचे तर माझा स्वभाव व व्यक्तिमत्वाशी अतिशय मिळात-जुळता असाच हा मोसम आहे. ‘क्षणात रिमझिम पाऊस पडे, क्षणात ऊन पडे,’ असा जो ऊन-पावसाचा छानसा लपंडाव या दिवसात चालतो व त्यातूनच मन कसे प्रफुल्लित होते. सर्वत्र हिरवळ-हिरवाई पसरलेली असते. वातावरण कसे मस्त व सकारात्मक असते, तशी मी आहे. हा माझा महिना आहे. हा श्रावण कायम सकारात्मक ऊर्जा देतो, रसरशीतपणे जगण्याची उर्मी देतो, मला हे असे जगायला खूप आवडते. त्यात पुन्हा हाच श्रावण खूप उत्साही सणही घेवून येतो. त्यात श्रावणी सोमवार व शनिवार या दिवशी उपवास म्हणजे व्यक्तिगत गोष्ट झाली. तर याच श्रावणातला गोकुळाष्टमी सण म्हणजे समूहाला एकत्र आणतो. त्यात पुन्हा श्रावण अशा टप्प्यावर येतो की, गणेसोत्सवाचे वेध त्यात लागतात, पाठोपाठ येणा-या दिवाळीची चाहूलही त्यातच लागते. श्रावणाचे महत्व हे असे अनेक कारणास्तव आहे. मी पूर्णपणे शाकाहारी असल्याने श्रावणाची संधी घेवून पुन्हा वेगळा उपवास वगैरे करावा लागत नाही. श्रावण एकूणच मला खूप भावतो, खूपच आवडतो.

स्मिता शेवाळे- आतापर्यंत मी एकटी राहत होते व कामातही बरीच बिझी असायचे. त्यामुळे श्रावण महिन्यांची वैशिष्टये मी अनुभवू शकत नव्हते. पण, यावेळचा श्रावण माझ्यासाठी लग्नानंतरचा पहिला श्रावण आहे. त्यामुळे, त्यातील मंगळागौर, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी वगैरे सगळे सण, तिथी, परंपरा या सा-याचा मी भरपूर आनंद घेत आहे. अशा प्रकारे मिळणारा आनंद कामातला गोडवा वाढवतो. याच श्रावणात शिरीष राणे, दिग्दर्शित ‘भविष्याची ऐसी तैसी’ या माझ्या नवीन चित्रपटाचे चित्रिकरण सुरु झाले आहे. लग्नानंतर काम थोडे कमी करून वैवाहिक जीवनाचा आनंद मी घेत आहे. त्यातच हा श्रावण आला हे विशेषच. एव्हाना, पाऊस बराचसा झाल्याने सर्वत्र आल्हाददायक वातावरण निर्मिती झालेली असते, एकदम रोमॅण्टिक मूड असतो. लग्नानंतर मी खूपच रोमॅण्टिक झाले आहे, हा माझ्यातला खूपच मोठा बदल श्रावणासाठी पूरक असाच आहे. मी दरवर्षी वैभवलक्ष्मीचे अकरा शुक्रवार उपवास करते, त्यातील काही शुक्रवार नेमके या श्रावणात आहे हेही विशेष. श्रावणी सोमवारी मात्र मी उपवास करते. लग्नानंतर हळूहळू सण, व्रतवैकल्प याची जाणीव होत आहे हे महत्वाचे.

योगिता दांडेकर- माझ्या मते श्रावण महिन्याची चार ठळक व अत्यंत महत्वाची वैशिष्टये आहेत. १.धार्मिक- या महिन्यात केवढे तरी सण व त्यानिमित्ताने कुटुंब जवळ येते. सध्याच्या वेगवान व स्पर्धात्मक जीवनशैलीत कुटुंबाला एकत्र येण्याचा योग तसा खूप कमीच येतो. पण, ती संधी श्रावण देतो. २.बदलती मानसिकता- इतर वेळी काही कुटुंबात काही कारणास्तव काहीशी कुजबूज, तर काहीशी धुसफूस सुरु असते. श्रावण महिन्यात ती आपोआप शांत होते, त्यासाठी तरी श्रावण हवाच. तो प्रत्येक महिन्याला का बरे येत नाही. ३.आहार- याच महिन्यात सणाच्या निमित्ताने घरच्या आहारात अळूवडी, कोशिंबीर वडी, साबुदाणा वडा अशा गोष्टींचे आगमन होते. गिरगाव-दादर-डोंबिवलीत हे पदार्थ रोज मिळत असतील. पण अन्य कुटुंबात श्रावणातच हे पदार्थ असतात. विशेष म्हणजे, इतर वेळी बाहेरचे खाणे पोटभर खाणारे श्रावणात मात्र घरी जेवणे पसंत करतात. ४.पावसाळ्यामुळे सर्वत्र निर्माण झालेले प्रचंड आल्हाददायक वातावरण मन प्रसन्न करते. मी तर प्रत्येक वर्षी या श्रावण महिन्याचीच वाट पाहते. माझ्यातील ऊर्जा, उत्साह, सकारात्मक वातावरण हे सगळच हा श्रावण देतो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress celebrating shravan and gopalkala