कॉलेज आठवणींचा कोलाज : गौरी किरण, अभिनेत्री
कोकणातील वेरळ हे माझे गाव. इथेच मी लहानाची मोठी झाले. तिथे दत्त जयंती आणि हनुमान जयंतीला तमाशा, ऑर्केस्ट्राची गजबज असायची. त्यामुळे मला नाच-गाण्याचे आकर्षण तेव्हापासून होते. मला नट्टापट्टा करून सजवण्याची आईलासुद्धा हौस होती. फाल्गुनी पाठकच्या तर सगळ्या गाण्यांवर मी नाचले आहे. घरात कुठलाही कार्यक्रम असो वा गावातील रेकॉर्ड डान्स स्पर्धा, माझा त्यात कायम सहभाग असायचा.
मी दापोलीच्या वराडकर कॉलेजमधून बी.कॉम. केले. अकरावीत आल्यावर मला एकांकिका हा काहीतरी प्रकार असतो हे ठाऊक झाले. पण या विश्वाची ओळख झाली एफवायला असताना. एका एकांकिका स्पर्धेच्या मुलीच्या रोलसाठी मुलगीच मिळत नव्हती, कारण अशा स्पर्धामध्ये गावातील मुली पटकन भाग घेत नाहीत. मात्र माझ्या एका मैत्रिणीने मला अक्षरश: ओढून त्या स्पर्धेच्या ऑडिशनला नेले. गौरी उत्तम नृत्य-नाटय़ करते अशी माझी ओळख त्या मैत्रिणीनेच करून दिली. आयुष्यातल्या पहिल्याच एकांकिकेत मी म्हातारीचा रोल केला होता. त्यात मला खूप मजाही आली. दापोलीतच आमच्या कॉलेजचा ‘छावा कलमांचा’ नावाचा एक चमू होता. पुढे तिथल्या मुलांसोबतही मी अनेक एकांकिका केल्या. एकांकिकांसाठी हा चमू बऱ्यापैकी नावाजलेला होता. लागोपाठ एकांकिका केल्याने माझा आत्मविश्वास हळूहळू दुणावत गेला. ज्यामुळे मला अभिनयाची आवड निर्माण झाली. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी मी परत एकांकिका स्पर्धेत भाग घेतला. त्या वेळी रवी वाडकरांनी लिहिलेली ‘वांझ’ नावाची एकांकिका मी केली. त्यातील माझ्या भूमिकेसाठी मला युथ फेस्टिव्हलमध्ये अभिनयासाठी बक्षीस मिळाले. खऱ्या अर्थाने या युथ फेस्टिव्हलमुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तोपर्यंत मी कधी स्वप्ननगरी मुंबई पाहिली पण नव्हती. युथ फेस्टिव्हलनिमित्त पहिल्यांदाच मुंबईला येऊन मोठय़ा व्यासपीठावर अभिनय करण्याची संधी मिळणे हेच माझ्यासाठी तेव्हा खूप महत्त्वाचे होते. तेव्हा रुईया, रुपारेलची मुले, त्यांचा दंगा आणि त्यांचा अभिनय पाहून मनात आले की, ‘कदाचित आपणही करू शकतो’. अभिनयक्षेत्रात प्रयत्न करायला काय हरकत आहे?
या सगळ्यात पदवी शिक्षण घेत असताना माझ्या मुख्याध्यापकांनी मला पाठबळ दिले. मी मुंबईला जाऊन काही तरी करून दाखवावे असे त्यांनाही मनापासून वाटत होते. अगदी माझ्यातले संभाषणकौशल्य बघता, पर्यायी व्यवस्था म्हणून पत्रकारितेला प्रवेश घे हासुद्धा त्यांचाच सल्ला होता. त्यांच्या आणि अर्थातच घरातल्यांच्या पाठिंब्यामुळे मी पदवी शिक्षणानंतर २०१२ साली मुंबईत आले. पुढे चर्चगेटच्या केसी कॉलेजमध्ये पत्रकारितेसाठी प्रवेश घेतला. तेव्हा नालासोपारा ते चर्चगेट असे अपडाऊन असायचे. पत्रकारितेचे शिक्षण घेत असतानाच मैत्रिणीच्या मदतीने मी आयुष्यातील पहिले ऑडिशन दिल्याचे आठवते. तिच्या ओळखीने जयंत घाटे यांनी मला ‘कुंकू’ मालिकेच्या ऑडिशनसाठी नेले होते. मंगेश कंठाळे त्या मालिकेचे दिग्दर्शक असल्याचे मला अजून आठवते. त्या वेळी मला कॅमेरा सेन्स अजिबात नव्हता. ऑडिशनसाठी कॅमेरा स्टॅण्डिंग लावलेला असताना मी ‘वांझ’ एकांकिकामधला माझा एक पॅच लोळून वगैरे करून दाखवला होता. तिथले तंत्रज्ञ हसले होते. त्यांना मजा वाटली होती. त्या भूमिकेसाठी मी फिट नव्हते पण त्या वेळी ‘गौरीला परत गावी नका पाठवू, ही काही तरी करेल,’ असे कंठाळे यांनी घाटे यांना सांगितले होते. घाटे यांनी सांगितलेले ते शब्द मी कधीच विसरू शकत नाही! पुढे कॉलेजसोबत ऑडिशन करत करत बऱ्याच एपिसोडिक मालिका केल्या. पुढे सिनेमाही झाला. नाचगाण्यापासून सुरू झालेला प्रवास एकांकिकांमुळे अभिनयापर्यंत आला आहे. या प्रवासाने खूप काही दिले आहे. अनेक नवीन गोष्टी शिकवल्या आहेत. कॉलेजमधल्या अनेक आंबट-गोड आठवणींचा साठा मनात आहे. सध्या मी करत असलेली ‘सिंधू’ ही मालिकासुद्धा मला माझ्या एकांकिकेच्या पाश्र्वभूमीमुळेच मिळाली आहे. युथ फेस्टिव्हलने माझ्यासारख्या कित्येक तरुणांच्या करिअरला पैलू पाडण्याचे काम केले असेल. कॉलेजमधल्या आठवणींच्या रंगीत कोलाजचे एका शब्दात वर्णन करायचे झाले तर ते केवळ ‘अविस्मरणीय’ असेच असेल!
शब्दांकन : मितेश जोशी