लहान शहरातील अनेक मुली मुंबईसारख्या मायानगरीत अभिनेत्री होण्याचे स्वप्न उराशी बाळगून येतात. फार कमी मुलींना मनासारखे काम मिळते. त्याचवेळी काहींना ‘कास्टिंग काऊच’चा सामना करावा लागतो. मुलींना भूमिका देण्याचे आमिष दाखवून तडजोड करण्यास सांगण्यात येते. करिअरची सुरूवात करायची म्हणून काही जणी तडजोड करतातही. हर्षाली झिने या मराठी अभिनेत्रीने तिचा कास्टिंग काऊचचा अनुभव कथन केला आहे. ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीतील हर्षालीचा अनुभव ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.

हर्षाली म्हणाली की, ‘जेव्हा मी कामानिमित्त मीटिंगला जायचे तेव्हा कमी अधिक प्रमाणात असेच अनुभव मला आले. या सगळ्याचा सामना करताना माझ्यासोबत एक अशी घटना घडली की ज्यामुळे मी आतून हादरले. एका फार मोठ्या व्यक्तीने मला फोन केला, मला आता त्याचे नाव घ्यायचे नाही. व्हॉट्सअॅपवर त्या व्यक्तिने माझ्याकडे शारीरिक संबंधांसाठी विचारणा केली. त्याच्या या मेसेजला मी काय उत्तर देऊ हेच कळत नव्हते. मी फार घाबरले होते. मराठी सिनेसृष्टीतील ती फार मोठी व्यक्ती आहे आणि त्याचे राजकारण्यांशीही जवळचे संबंध आहेत. मी काही बोलले असते तर सगळेच संपले असते, याची मला पूर्ण जाणीव होती. कारण ती व्यक्ती काहीही करु शकते. मला हे संपूर्ण प्रकरण फार चतुराईने हाताळायचे होते, म्हणून मी त्याला भेटण्याचे मान्य केले.

त्यानंतर त्याने मला एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. त्याने सांगितलेल्या रंगाचे कपडे घालण्याचीही गळ घातली होती. त्यावेळी काय करावे हेच मला कळले नाही. तो नेहमी मला मध्यरात्री फोन करायचा आणि अश्लील बोलायचा. त्याचे ते बोलणे ऐकून मला रात्रीची झोपही यायची नाही. त्याने मला सलग एक महिना फोन केला. त्याने माझे अपहरण केले असते तर… असे एक ना अनेक नकारात्मक विचार त्यावेळी माझ्या मनात येत होते. त्यानंतर मी त्याचा फोन न उचलण्याचा निर्णय घेतला आणि त्याला नक्की काय हवे आहे ते विचारले. त्यावर तो म्हणाले की, तो एका नाटकाची निर्मिती करतो आहे आणि त्या नाटकात तो मला घेऊ इच्छितो. यासाठी रात्री दोन वाजता फोन करण्याची काय गरज होती, असा प्रश्न मला पडला.

https://twitter.com/TimesNow/status/924556696952770560

त्याच्या आगामी सिनेमात भूमिका देण्याबद्दलही तो माझ्याशी बोलला. पण त्यासाठी त्याने तडजोड करण्यास सांगितले. मी त्याच्यासोबत एका मराठी टीव्ही शोसाठीही काम केले आहे. तो मला चांगलं ओळखतो. त्याच्याकडून मला अशी विचारणा व्हावी, याचे मला आश्चर्य वाटले. तुम्ही काय बोलताय हे मला कळत नाही, असं मी त्याला इंग्रजीतून विचारले. त्याला इंग्रजी येत नसल्यामुळे मग मी हिंदीत माझा प्रश्न विचारला. त्यावर तो म्हणाला की, जर तुला ही भूमिका हवी असेल तर तडजोड करावी लागेल. त्याच्या तोंडून हे वाक्य ऐकून मला धक्काच बसला. तो मराठीतला फार मोठा निर्माता आहे. त्याच्या एका फोनवरून मला बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत कोणीही सिनेमा देऊ शकतो.’