अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी धुमाळ हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. त्यासोबतच ती तिच्या चित्रपटासह खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींवर पोस्टही शेअर करत असते. मात्र यामुळे अनकेदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकतंच हेमांगीने एका मुलाखतीत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.
हेमांगी कवी ही अनेकदा बिनधास्तपणे व्यक्त होत असते. काही लोक तिच्या या पोस्टला समर्थन देताना दिसतात. तर काहीजण यामुळे तिला ट्रोल करताना दिसतात. नुकतंच एका मुलाखतीत तिला याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “मला लोक हिणवतात, ट्रोल करतात. याचा मी सुरुवातीला फार विचार करायचे. पण आता मी त्याला महत्त्व देत नाही. ट्रोल करणाऱ्या लोकांपासून वाचावं म्हणून मी माझं अकाऊंट कधी बंदही केलं नाही आणि कमेंट डिलीटही केलेल्या नाहीत.”
“आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही”, अभिनेत्री हेमांगी कवीची पोस्ट व्हायरल
“त्याउलट माझ्या पोस्ट या ट्रोलर्समुळे चर्चेत आल्या. त्यामुळे अनेक तरुण मुलं मुली माझ्याशी जोडले गेले आणि त्यांनी याबद्दल माझ्याकडे मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी आम्ही एकमेकांशी चर्चा केली. त्या संबंधित मुद्द्यावर प्रत्येकाने मनातील खदखद व्यक्त केली. त्यामुळे मी ट्रोलर्सचे मनापासून आभार मानते कारण त्यांनीच मला मोठं केलं आहे”, असेही ती म्हणाली.
“आपल्या बोलण्यामुळे कोणी आपल्याला ट्रोल करतंय, यामुळे आपलं करिअर संपेल याचा मी कधीही विचार करत नाही. मला सिनेसृष्टीत काम मिळणार नाही, याचीही मला भीती वाटत नाही. मी कधी स्वतःची तुलना कुणासोबत केली नाही. मुळात मी कुठल्या स्पर्धेत उतरलेच नव्हते, आजवर जे काम मिळालं, त्या कामात १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न केला. मी अगदी १५ सेकंदाचं रीलही मी मनापासून करते”, असेही तिने म्हटले.
“आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?”, हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“आपण जसे कलाकार आहोत, तसे नागरिकही आहोत हा विचार मी करते. मी कर भरते, मतदान करते, त्यामुळे मलाही बोलण्याचा अधिकार आहे. आपत्ती आल्या की कलाकारांनी मदत करण्याची अपेक्षा केली जाते. त्यावेळी त्यांची सामाजिक बांधिलकी काढली जाते. मग इतरवेळीही आम्ही जागं असणं गरजेचं आहे ना? मी आधी माणूस मग कलाकार आहे, त्यामुळे व्यक्त होणं हा माझा अधिकार आहे”, असेही हेमांगी कवी म्हणाली.
दरम्यान काही दिवसांपूर्वी हेमांगीने ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेतून एक्झिट घेतली. त्यानंतर तिचं शहर होणं या नव्या प्रोजेक्टमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वरूण नार्वेकर यांच्या सिरीजमधूनही ती महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.