खऱ्या आयुष्यातील आई आणि चित्रपट-महामालिका यांच्यातील आई अशा दोन्ही भूमिका व भावना यांचा मला खूप चांगला अनुभव आहे. आईच्या भूमिकेचा अभिनय साकारताना खऱ्या आईच्या जाणिवेचा निश्चितच फायदा होतो. आईचा अभिनय करावा लागतो असे मी मानत नाही. आई हे स्वाभाविक असेच नाते आहे. असो. वास्तव जीवनात मी आई होऊन तब्बल वीस वर्षाचा कालावधी झाला. माझा ‘बॉबी’ आज वीस वर्षाचा आहे. मी गरोदर असतानाच त्याचे बाबा दीपक बलराज वीज आणी मी आम्ही दोघांनी ठरवले होते की आपल्याला मुलगा अथवा मुलगी यापैकी काहीही जरी झाले तरी त्याचे नाव बॉबी ठेवायचे. त्या काळात मी मनोरंजन क्षेत्रापासून खूप खूप दूर राहिले, पण दीपकजींच्या चित्रपट निर्मिती व दिग्दर्शन या कामामुळे थोडासा संपर्क हा राहिलाच. पण बॉबी थोडा मोठा होईपर्यंत आपण कॅमेऱ्यासमोर यायचे नाही हे पाळणे मला जमले. त्या काळात सतत माझ्या मनात माझे बाळ असे व तेव्हा मला माझ्या आईच्या माझ्यावरील ममतेची कल्पना होत गेली. आईच्या नात्याचे जणू एक वर्तुळच पूर्ण होत होते. १७ सप्टेंबर १९९४ रोजी बॉबी जन्मला. तो लहानाचा मोठा होताना ‘शिर्डी के साईबाबा’ आणि ‘मालिक एक’ अशा साईबाबांच्या दोन चित्रपटातून त्याने भूमिका साकारल्या. त्याला अभ्यासाची खूप आवड असल्याने त्याने सर्वप्रथम उच्च शिक्षण घ्यावे आणि मग अभिनयाच्या क्षेत्रात यावे, असे आम्ही ठरवले. आज तो पंधरावीला म्हणजे कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे. मी मिठीबाई महाविद्यालयात असताना माझे सर्व शिक्षण सांभाळूनच चित्रपटातून भूमिका साकारायला सुरूवात केली. कोणत्याही क्षेत्रात वावरताना व वाढताना सर्वप्रथम उत्तम शिक्षणाची गरज असते. त्याला आमचे क्षेत्रदेखील अपवाद नाही. खरं तर येथे यश आणि अपयश हे दोन्ही पचवण्यासाठी चांगल्या शिक्षणाची गरज आहे. बॉबीला एक आई या नात्याने मी या साऱ्याची उत्तम कल्पना दिली आहे. शिक्षण व अभिनय याचा त्याने उत्तम समतोल सांभाळावा हेच मी ‘मदर्स डे’च्या निमित्ताने सांगू इच्छित आहे.

Story img Loader