चार राज्य पुरस्कारांची आणि इतर अनेक पुरस्कारांची मानकरी ठरलेली एक चतुरस्र अभिनेत्री म्हणून आपल्याला परिचित असलेल्या आणि नाट्य-चित्रपट-अभिनय शिबीर-कार्यशाळा अशा नानाविध माध्यमांतून गेल्या दोन दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात घोडदौड करणाऱ्या अभिनेत्री मधुरा वेलणकरने एका नव्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ‘मधुरवं’ या पुस्तकाच्या माध्यमातून तिने लेखन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिने लिहीलेल्या ‘मधुरवं’ या पुस्तकाचं ८ ऑक्टोबर रोजी प्रकाशन होणार आहे.
सुरुवातीला वाचनाचीही फारशी आवड नसलेल्या मधुराने ‘मधुरवं’ या सदरातून स्वतःचे अनुभव मांडायला सुरुवात केली आणि ती या लेखनप्रपंचात रमून गेली. विशेष म्हणजे आता सदर किंवा नियतकालिकांमध्ये लिहिणाऱ्या मधुराचा प्रवास पुस्तक लेखनाकडे झाला आहे.
‘रसिक आन्तरभारती’ या प्रकाशनाकडून प्रकाशित केल्या जाणाऱ्या या पुस्तकाच्या प्रकाशनसोहळ्याची सगळी सूत्रं लोकप्रिय अभिनेता पुष्कर श्रोत्री यांच्या हातात असून अनेक कलाकार या सोहळ्याचे साक्षीदार असणार आहेत. तर ‘चला हवा येऊ द्या’फेम श्रेया बुगडे आणि ‘माझ्या नवर्याची बायको’फेम अनिता दाते या दोन अभिनेत्री ‘मधुरवं’ पुस्तकातल्या निवडक अंशांचं अभिवाचन या प्रसंगी करणार आहेत.