अभिनेत्री माधुरी पवार ही नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ती ‘रानबाजार’ या मराठी वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. तिची या वेबसीरिजमधील भूमिका प्रचंड गाजली. नुकतंच माधुरीने मुंबईतील घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली. त्याचा एक व्हिडीओ नुकताच तिने शेअर केला आहे.
दोन वर्षे करोनाच्या निर्बंधांनंतर यंदा मुंबई आणि परिसरात दहीहंडीचा दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. करोनासह वाढणाऱ्या इतर साथीच्या आजारांची भीती बाजूला सारून अनेक गोविंदा पथकांनी रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. तर अनेक राजकीय पक्षांनी दहीहंडीची संधी साधत शक्तीप्रदर्शन केले. त्यासोबतच दहीहंडी पथकांसाठी आकर्षक बक्षिसेही ठेवली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजपा आमदार राम कदम यांचा घाटकोपरमधील दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी दहीहंडी पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी विविध कलाकारांना बोलवण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री माधुरी पवार ही देखील या दहीहंडी उत्सवात सहभागी झाली होती.
“रिअॅलिटी शो विजेत्याची क्रेझ फक्त दोन-तीन महिनेच, त्यानंतर….”, ‘अप्सरा आली’ विजेत्या स्पर्धकाने सांगितला कटू अनुभव
नुकतंच माधुरीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती घाटकोपरमधील दहीहंडी उत्सवात मंचावर डान्स करताना दिसत आहे. अगं बाई अगं बाई या नव्या गाण्यावर ती डान्स करताना दिसत आहे. या डान्सद्वारे ती विविध दहीहंडी पथकांचा उत्साह वाढवताना दिसत आहे. यासोबत तिने या व्हिडीओ कॅप्शन देताना राम कदम यांचे आभारही मानले आहेत.
मा. आ. राम कदम आयोजित भारतातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव, घाटकोपरच्या मंचावर परफॉर्म करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे. तिचा हा व्हिडीओ आणि पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
दरम्यान‘अप्सरा आली’ या रिअॅलिटी शोमधून माधुरी ही घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती. तसेच काही महिन्यांपूर्वी ‘देवमाणूस’ या मालिकेच्या पहिल्या भागात दिसली होती. यात तिने चंदाचे पात्र साकारले होते. माधुरी पवार ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून तिला नृत्यासह तिच्या अभिनयामुळे ओळखले जाते.