आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. सध्या ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसी नाईक ही लवकरच तिचा पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच मानसीने घटस्फोटासाठी अर्ज दिल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ती सातत्याने चर्चेत आहे. घटस्फोटांच्या या वृत्तादरम्यान आता मानसी नाईकने तिने लग्न का केलं? त्यामागचे कारण काय? याबद्दल भाष्य केले आहे.
मानसी नाईकने नुकतंच ‘ई-सकाळ’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या लग्न करण्यामागे नेमक काय कारण होतं याबद्दलचा खुलासा केला आहे. यावेळी ती म्हणाली, “मानसी नाईक ही फार डेअरिंगबाज आहे की नाही हे मला माहिती नाही. पण हा जन्म माणसाचा आहे. माणसाला सर्व भावना या देवाने दिल्या आहेत. आपण ज्या तोंडाने हो बोलतो ना, त्याच तोंडाने आपण नाही बोलायला शिकले पाहिजे. हो मला आवडतं आणि नाही मला पटत नाही, असेही आपल्याला बोलता यायला हवं. मी काहीही खोटं बोलणार नाही किंवा अजिबात खोटं खोटं वागणार नाही. मला त्रास होत नाही असंही मी म्हणणार नाही.”
आणखी वाचा : “एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण
यापुढे तिला लग्न करायच्या आधी तू खूश होतीस, कशाला लग्न करायचं वैगरे या चर्चा सर्वत्र सुरु आहेत. त्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर ती म्हणाली, “मी तुला खरं सांगू का लग्न करायची काय गरज होती? लग्नाच्या आधी खूश होती, सर्व चांगल होतं मग असं कसं काय झाल? या सर्व प्रश्नांची उत्तर माझ्याकडे आहेत. पण सध्या मी लोकांच्या कमेंट वाचते त्या वाचून त्रास होतोय.”
“मी सिनेसृष्टीशी संबंधित नसलेल्या घरात जन्मलेली मुलगी आहे. माझ्या घरातला बँकग्राऊंड हा अजिबात फिल्मी नाही. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढली. माझे कुटुंब हे पुणेरी मानसिकता असणारे आहे. मी एका कौटुंबिक वातावरणात वाढलेली मुलगी आहे. त्यामुळे मी सिनेसृष्टीत येण्याचा निर्णय हा माझा मी घेतला. माझं घर यामुळे चालत नाही. मी माझं हे क्षेत्र निवडलं.
प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की तिने लग्न करावं, एक राजकुमार असावा असं सर्व असावं. आजूबाजूला आपण कपल्स बघितल्यावर आपल्यालाही ते वाटतं. मला देवाने फार रोमँटिक आणि प्रेमळ बनवलं आहे. कारण मी प्राणीप्रेमी आहे. मला माणसं आवडतात. त्यांच्याशी गप्पा मारायला आवडतात. मी घरी स्वंयपाक, पूजापाट, अध्यात्म हे सर्व मला आवडतात. पण एक परिपूर्ण असलेले पॅकेज चुकीच्या पत्त्यावर पोहोचलं तर काय होऊ शकतं तेच नेमकं घडलं. तेच माझ्या नशिबात आलं. पण मी अजिबात नशिबाला दोष देत नाही. फक्त मला प्रेम हवं होतं. मी माझं सर्व केलं आहे. मला आता करिअर घडवायचं आहे म्हणून मी काम करतेय. पण माझ्यातल्या मानसी नाईकला एक कुटुंब हवं होतं म्हणून तिने लग्न केलं. आता दोन्हीही संस्कृतींना जपण्याचा विडा मी पत्नीधर्म म्हणून उचलला आणि तो निभावला”, असे मानसीने म्हटले.
आणखी वाचा : “त्यांनी मित्राचा बुरखा पांघरला आणि…” घटस्फोटाच्या चर्चांवर मानसी नाईकने पहिल्यांदाच सोडलं मौन
दरम्यान मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण त्यानंतर त्या दोघांनीही इन्स्टाग्रामवरून एकमेकांबरोबरचे फोटो डिलीट केले होते. त्यामुळे दोघांच्याही नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
अखेर ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मानसी नाईकने पहिल्यांदा मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं. “माझ्या घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे.” असे तिने म्हटले होते.