आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. तिचे ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ ही गाणी तुफान गाजली. त्यामुळे मानसी नाईक हे नाव घराघरात पोहोचलं आहे. मात्र आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या वैवाहिक जीवनात वादळ आलं आहे. ती लवकरच घटस्फोट घेणार आहे. मानसीने घटस्फोटासाठी अर्ज दिल्याचे एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. मानसी नाईकने तिच्यात आणि पती नेमकं काय बिनसलं याबद्दलही खुलासा केला आहे.
मानसी नाईक ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असते. नुकतंच तिने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत मानसी नाईकने पहिल्यांदा मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. “माझ्या घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे.” असे तिने म्हटले होते. त्यानंतर मानसी नाईकने तिच्या घटस्फोटामागची कारण सांगितली आहे.
आणखी वाचा- “तिला कंट्रोल…” दीपाली सय्यद यांनी मानसी नाईक-प्रदीपच्या लग्नाबद्दल केलेला खुलासा
“आमच्यात नेमकं काय चुकलं हे सांगणं आता माझ्यासाठी कठीण आहे. आमच्यात काही गोष्टी ठीक होऊ शकल्या नाहीत. पण हे सगळं खूपच वेगात घडलं. आजही माझा प्रेमावर विश्वास आहे. मला पुन्हा प्रेम करायचं आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा मला माझं कुटुंब हवं होतं आणि त्यामुळे मी लग्न केलं. अर्थात तेही सर्व खूपच घाईघाईत झालं.
मला वाटतं कदाचित तिथेच काहीतरी चुकलं. या लग्नाच्या नात्यातून वेगळं होण्याची वेळ आता आली आहे. त्याच्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल मला कायम आदर आहे. पण एक स्त्री म्हणून माझा स्वाभिमान आणि स्वतःची काही मतंही महत्त्वाची आहेत. एखाद्या व्यक्तीला आपण सोडून देऊ एवढ्या खालच्या थराला ती व्यक्ती जाऊ शकते हे समजून घेणं माझ्यासाठी गरजेचं होतं”, असे मानसी नाईक म्हणाली.
आणखी वाचा- “त्यांनी मित्राचा बुरखा पांघरला आणि…” घटस्फोटाच्या चर्चांवर मानसी नाईकने पहिल्यांदाच सोडलं मौन
“मला आता या सगळ्या गोष्टी मागे सोडायच्या आहेत. आता मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे. सध्या एक कलाकार म्हणून माझ्यासाठी माझं कुटुंब, माझा मित्रपरिवार, मी स्वतः आणि माझे प्रेक्षक, चाहते हेच महत्त्वाचं आहे. कधी कधी तुमचा माणसांवरील विश्वास उडतो आणि हेच माझ्याबाबतीत घडलं. मला भावनिकदृष्ट्या आधाराची गरज होती. पण दुर्दैवाने त्या नात्यात असं काहीच घडलं नाही. जर एकाच व्यक्तीला कायम समर्थन मिळत असेल आणि दुसऱ्या व्यक्तीला ते मिळत नसेल तर मला वाटतं अशा नात्यातून बाहेर पडणं नेहमीच चांगलं. जर तुमच्या नात्यात हा समजूतदारपणा नसेल तर ती तुमच्यासाठी धोक्याची सूचना आहे”, असेही तिने यावेळी सांगितले.