अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी चौफेर प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणून मनवा नाईकला ओळखले जाते. तिने आतापर्यंत अनेक आघाडीच्या चित्रपटात काम केले आहे. फक्त अभिनेत्री म्हणून नव्हे तर एक यशस्वी निर्माती म्हणूनही तिला ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटातही ती झळकली होती. यात तिने छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नीची सोयराबाई मोहिते ही भूमिका साकारली होती. मात्र नुकतंच मनवा नाईकला एका धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले आहे. तिने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनवा नाईकने तिच्या अधिकृत फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एका गाडीचा नंबर आणि त्या वाहन चालकाचा फोटो शेअर केला आहे. याबरोबर तिने तिच्याबरोबर घडलेल्या धक्कादायक प्रसंगाबद्दल सांगितले आहे. या पोस्टला कॅप्शन देताना तिच्याबरोबर नेमकं काय घडलं हे तिने सविस्तर सांगितलं आहे.

मनवा नाईकची संपूर्ण पोस्ट

हा प्रसंग शेअर करायलाच हवा. मी रात्री ८.१५ च्या सुमारास उबर केली. मी वांद्रे-कुर्ला संकुलात पोहोचल्यावर तो उबर चालक हा फोनवर बोलत होता. मी त्याला फोनवर बोलू नका असे सांगितले. त्यानंतर त्याने बीकेसीमधील एक सिग्नल तोडला. मी त्याला असे करु नका, असं पुन्हा एकदा सांगितलं. पण त्याने माझे काहीही ऐकले नाही.

यानंतर पुढे गेल्यावर ट्राफिक पोलिसांनी त्याला अडवले. त्याचा फोटो क्लिक केला. पण त्या उबर चालकाने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यानंतर मी हस्तक्षेप केला. मी गाडीचा फोटो काढला आहे, त्यामुळे आता जाऊ द्या, असे मी पोलिसांना सांगितले.

पण त्यानंतर त्या उबर चालकाला भयंकर राग आला. त्याने तू ५०० रुपये भरणार आहेस का? असं मला चढलेल्या आवाजात विचारले. त्यावेळी मी म्हणाली, तू फोनवर बोलत होतास. त्यानंतर त्याने पुन्हा गाडी चालवण्यास सुरुवात केली आणि त्यावेळी त्याने मला धमक्या दिल्या. थांब तुला दाखवतो, अशा शब्दात त्याने मला धमकावले.

यानंतर मी त्याला गाडी पोलीस स्टेशनजवळ घ्या असे सांगितले. तर त्याने बीकेसीमधील जिओ गार्डन परिसरात गडद अंधार असलेल्या ठिकाणी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी पुन्हा गाडी पोलीस स्टेशनला घ्या, असे त्याला सांगत होते. तो संपूर्ण प्रवासात माझ्याशी वाद घालत होता आणि गाडीही भरधाव वेगाने चालवत होता. वांद्रे कुर्ला संकुलाच्या परिसरात असलेल्या कुर्ला पुलावर त्याने पुन्हा एकदा गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला.

काय करणार… थांब दाखवतोच आता, अशी धमकीही त्याने मला दिली. त्यानंतर मात्र मी उबर सेफ्टीला फोन केला. उबरमधील ग्राहक सेवा कर्मचाऱ्याबरोबर फोनवर बोलत असतानाही तो भरधाव वेगाने गाडी चालवत होता. हा सर्व प्रकार सुरु असताना गाडी चुनाभट्टी रोडवरील प्रियदर्शनी पार्कपर्यंत पोहोचली होती. त्यावेळी मी त्या चालकाला गाडी थांबव, असे सांगितले. पण त्याने माझे काहीही ऐकले नाही. त्यावेळी त्याने कोणाला तरी फोन केला.

मी जोरजोरात हाका मारु लागली. ओरडायला लागली. त्यावेळी दोन दुचाकीस्वार आणि एका रिक्षाचालकाने मला त्या उबरमधून बाहेर काढण्यास मदत केली. त्यांनी त्या गाडीतून मला बाहेर काढले. मी सध्या सुरक्षित आहे. पण नक्कीच या सर्व प्रसंगामुळे माझी घाबरगुंडी उडाली आहे, असे मनवा नाईक म्हणाली.

दरम्यान मनवा नाईकच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. सध्या तिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. अभिनेते सुनील तावडे यांनीही तिची ही पोस्ट रिशेअर केली आहे. तसेच तिने या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांसह, महापालिकेलाही टॅग केले आहे.