Manisha Kelkar Success Story : आजच्या काळात मल्टिटास्किंग असणाऱ्याला प्रचंड महत्त्व आहे. सिनेसृष्टीतल्या अनेक अभिनेत्री आपलं करिअर सांभाळून विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत आहेत. जिनिलीया देशमुख नॅशनल लेव्हलला फुटबॉल खेळलेली आहे. तर, प्राप्ती रेडकरने किक बॉक्सिंगच्या अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश मिळवलं आहे. आता सध्या आणखी एक अभिनेत्री तिच्या आगळ्यावेगळ्या करिअरमुळे चर्चेत आली आहे. मुंबईची मनिषा केळकर ‘फॉर्म्युला वुमन कार रेसिंग नेशन्स चॅम्पियन कप’ स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. जागतिक स्तरावर ‘कार रेसर’ म्हणून तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मनिषा केळकर यापूर्वी इंडस्ट्रीत सक्रिय होती. ‘ह्यांचा काही नेम नाही’ या सिनेमात सुद्धा तिने काम केलेलं आहे. काही सिनेमे केल्यावर तिने करिअरची वेगळी वाट धरली. कॉलेजपासूनच मनिषाला ड्रायव्हिंगची प्रचंड आवड होती. यानंतर, २००५ मध्ये तिने गो कार्टिंग सुरू केलं. मनिषा हळुहळू गो कार्टिंग स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागली.
मनिषा याबाबत ‘सामना’ या वृत्तपत्राशी संवाद साधताना म्हणाली, “आपल्याकडे या खेळाबाबत फारशी कोणाला माहिती नाहीये. कारण, याचं स्वरुप खर्चिक आहे आणि पुरेशा सोयी-सुविधांचा अभाव आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये यासाठी सराव ट्रॅक उपलब्ध आहेत. मी तिथेच जास्त सराव केला आहे.” ‘फॉर्म्युला वुमन कार रेसिंग नेशन्स चॅम्पियन कप’ या स्पर्धेत एकूण २६ देश सहभागी झाले आहेत. या स्पर्धेसाठी दोन वर्षांपूर्वी तिची निवड झाली. मधल्या काळात अनेक फेऱ्या पार पडल्या आणि या सगळ्यात ती पात्र ठरली. क्वॉलिफाइंग राऊंडपासून सुरु झालेला तिचा प्रवास आता अंतिम फेरीपर्यंत जाऊन पोहोचला आहे.
मनिषाने या स्पर्धेत विजयी व्हावं यासाठी सर्व स्तरांतून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. या खेळाने आत्मसन्मान, आत्मविश्वास देऊन नव्या जगाची ओळख निर्माण करून दिली, आता येत्या काळात या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या अनेक मुलींना बळ मिळेल असा विश्वास मनिषाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा : भाजपा खासदार तेजस्वी सूर्या लोकप्रिय गायिकेशी बांधणार लग्नगाठ? कोण आहे ती? पंतप्रधान मोदींनी केलेलं कौतुक
दरम्यान, मनिषा केळकरच्या पोस्टवर पूजा सावंत, मेघा धाडे, स्वप्नील राजशेखर, सारंग साठ्ये असा असंख्य कलाकारांनी कमेंट्स करत तिला स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd