लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. अल्पावधीतच तिने कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्यानेही चाहत्यांना भुरळ पाडली. प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे. ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती कुटुंबीयांचे फोटोही शेअर करते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वीच प्राजक्ता कुटुंबियांसोबत ट्रिपला गेली होती. तिथे तिने भावंडांसह पावसात लगोरी खेळण्याचा आनंद लुटला. लगोरी खेळतानाचे फोटो आणि व्हिडीओही तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत. व्हिडीओमध्ये प्राजक्तासह तिच्या लाडक्या भाच्याही दुडूदुडू पळताना दिसत आहेत. “लगोरी…आमच्या कुटुंबाचा हा आवडता खेळ झाला आहे. भर पावसात ३-३ तास वेड्यासारखे खेळलो. त्यामुळे अजूनही अंग दुखत आहे. पण हरकत नाही. माती-गवतावर खेळल्यानं माझी त्वचा जास्त glow करत आहे”, असं कॅप्शन तिने ह्या पोस्टला दिलं आहे.

हेही पाहा >> Photos : आई-बाबा आणि भाच्या, प्राजक्ता माळीची कुटुंबीयांसह खास ट्रिप

प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. एका युजरने “कसलं भारी, सगळ्यांना आपल्या बालपणाच्या गोड आठवणींची परत आठवण करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद”, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने कमेंट करत “खूप भारी. आजकाल जुने खेळ काही जण विसरलेत, खेळत नाहीत. खूप दिवसांनी पाहिलं”, प्राजक्ताचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : “सिद्धार्थने पहिल्याच दिवशी १२ ऑम्लेट…”, मकरंद अनासपुरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

प्राजक्ता अभिनेत्रीबरोबरच एक उत्तम नृत्यांगणाही आहे. छोट्या पडद्यावरून तिने अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेने तिला विशेष लोकप्रियता मिळवून दिली. मालिकांबरोबरच तिने चित्रपटांमध्येही काम करून अभिनयाचा ठसा उमटवला. तिने ‘रानबाझार’ वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केलं. सध्या प्राजक्ता सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress prajakta mali played lagori with family video vial on social media kak