मराठी चित्रपटसृष्टीतील उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी आजही लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. त्या दोघांना एकत्र पाहिलं की त्यांचे चाहते त्यांना ‘Made for each other’ आणि ‘Couple Goal’ असे म्हणतात. उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतंच प्रियाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने सुखी वैवाहिक जीवनाचे रहस्य सांगितले आहे.
प्रियाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तुम्हाला आमच्या सुखी वैवाहिक जीवनाचे रहस्य जाणून घ्यायचे आहे का? असा प्रश्न तिने या व्हिडीओला कॅप्शन देताना विचारला आहे. यासाठी तुम्ही रिल पाहा, असे तिने सांगितले आहे. या रिलची सुरुवात यशस्वी विवाहासाठी सर्वोत्तम गोष्ट काय? या तिच्या प्रश्नाने होते.
यावर ती म्हणते की, ‘सुखी वैवाहिक जीवनासाठी दोन व्यक्तींमध्ये काही गोष्टी आवश्यक असतात. त्यातील एक व्यक्ती हा आळशी असावा आणि दुसरा व्यक्ती हा उत्साही असावा’, असे तिने या मजेशीर व्हिडीओत म्हटले आहे. या व्हिडीओत उमेशही दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. सध्या तिचा हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे.
“माझ्या कोणत्याही निर्णयावर मी खंत…”, तेजश्री प्रधानची ‘ती’ पोस्ट चर्चेत
उमेश आणि प्रियाच्या लग्नाला गेल्या ऑक्टोबर महिन्यात १० वर्ष पूर्ण झाली आहे. प्रिया आणि उमेश यांनी सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न केले. उमेश अभिनय क्षेत्रात असल्याने प्रियाच्या कुटुंबाचा या लग्नाला सुरुवातीला विरोध होता. प्रिया आणि उमेशच्या वयात जवळपास आठ वर्षांचा फरक आहे.