मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांना ओळखले जाते. सध्या ते दोघेही ‘जर तर ची गोष्ट’ या नवीन नाटकामुळे चर्चेत आहेत. या नाटकामुळे तब्बल ९ वर्षांनी ते दोघेही रंगभूमीवर झळकले. सध्या या नाटकावर प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अद्वैत दादरकर, रणजित पाटील दिग्दर्शित ‘जर तर ची गोष्ट’ हे नाटक सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलं आहे. सोनल प्रॉडक्शन निर्मित, इरावती कर्णिक लिखित या नाटकाने सध्या सर्व नाट्यगृहांबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकवला आहे. ५ ऑगस्टपासून नाट्यरसिकांच्या भेटीला आलेल्या या नाटकाने आतापर्यंत सुमारे १५ प्रयोग केले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व प्रयोग हाऊसफुल्ल झाले आहेत. यावरूनच हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “प्रसिद्धीसाठी वापर, पॉकेटमनी अन्…”, मानसी नाईकने सांगितली लग्न व घटस्फोटाची संपूर्ण कहाणी; म्हणाली “त्यांच्या घरी धुणी-भांडी”
प्रिया बापट सादर करत असलेल्या या नाटकाचे निर्माते नंदू कदम आहेत. या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी अजय आणि आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दहा वर्षांनी प्रिया बापट आणि उमेश कामत एकत्र रंगभूमीवर काम करत आहे. त्यामुळे चाहत्यांना त्यांना पाहण्याची विशेष उत्सुकता आहे. या नाटकावर सर्व वयोगटातील प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कुठेतरी प्रत्येकाच्या आयुष्याशी साधर्म्य साधणारे हे नाटक प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.
“प्रेक्षकांना आम्हाला रंगमंचावर एकत्र पाहण्याची इच्छा होती आणि दहा वर्षांनंतर ती पूर्ण झाली. ‘जर तर ची गोष्ट’ला नाट्यरसिकांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. नाटक संपल्यावर प्रेक्षक आम्हाला आवर्जून भेटायला येत आहेत. नाटकाचं, आमचं कौतुक करतात. सोशल मीडियावरही अनेकांचे संदेश येत आहेत. अनेकांना हे नाटक पुन्हा पाहण्याची इच्छा आहे. नाटकाबद्दलच्या या सकारात्मक प्रतिक्रिया मनाला उभारी देणाऱ्या आहेत. तुमच्या सर्वांचे हे प्रेम पाहून आम्हाला अधिक उत्तम काम करण्याची ऊर्जा मिळते. कलाकाराला याहून जास्त काय हवं”, अशी प्रतिक्रिया प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी दिली.