नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने स्वतंत्र स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. सध्या ऋतुजा ‘माटी से बंधी डोर’ या हिंदी मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता अंकित गुप्तासह प्रमुख भूमिकेत ऋतुजा झळकली आहे. अशातच तिला संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार २०२३’चा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यासंदर्भात तिने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री ऋतुजा बागवेने काही फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. या फोटोंमध्ये ऋतुजाचे आई-बाबा दिसत आहेत. हे फोटो शेअर तिने लिहिलं आहे, “उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार २०२३ (रंगमंच अभिनय) संगीत नाटक अकादमी..मी नाटकवेडी, तुला कोणत्या माध्यमात काम करायला जास्त आवडतं विचारल्यावर मी क्षणाचाही विलंब न घेता उत्तर देते ‘नाटक’…इतका मोठा मानाचा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा जरा मनात धस्स झालं. मनात आलं आपण फार काम केलं नाहीये, आपण या पुरस्कारच्या पात्र आहोत का? (२२) एकांकिका (२) प्रायोगिक नाटक (३) व्यावसायिक नाटक…पण जे काम केलं जीव ओतुन केलं एवढं मात्र नक्की आणि त्याची जेव्हा राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाते…तो आनंद आत्मा सुखावणारा असतो…आणि यात मोलाचा वाटा आहे ‘अनन्या’ नाटकाचा.”
पुढे ऋतुजा बागवेने लिहिलं, “अनन्या नाटकाचे मी ३०० प्रयोग केले. या नाटकाने कौतुक, पुरस्कार, समाधान, प्रसिद्धी, पैसा, मायबाप रसिक प्रेक्षकांच प्रेम खूप काही दिलं… आज हा पुरस्कार मी ‘अनन्या’ ला आणि माझ्या अनन्याच्या संपूर्ण टीमला समर्पित करते…माझ्या नाटकांचे दिग्दर्शक भिमराव मुडे, प्रल्हाद कुडतरकर, प्रताप फड, सचिन गोस्वामी, अमोल भोर, सिद्धार्थ साळवी तुमचे माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. मी तुमची कायम कृतज्ञ आहे.”
“सर्व द्वेष करणारे, ट्रोल करणारे, ज्यांनी माझा अनादर केला आणि मला परावृत्त केलं त्यांची मी आभारी आहे. माझं कुटुंब, मित्र-मैत्रीण, शुभचिंतक, ज्यांनी मला पाठिंबा दिला आणि माझ्यावर विश्वास ठेवला, मायबाप रसिक प्रेक्षक ज्यांनी भरभरून प्रेम दिलं, यांची मी कायम ऋणी राहीन. खूप सारं प्रेम आणि आदर…संगीत नाटक अकादमी खूप खूप धन्यवाद…राम कृष्ण हरी…स्वामी समर्थ,” असं ऋतुजाने लिहिलं आहे.
हेही वाचा – “पाच वर्ष सुरू असलेला हा प्रवास…”; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाली, “लॉकडाऊनमध्ये…”
दरम्यान, ऋतुजा बागवेच्या या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री शर्मिला शिंदे, आशुतोष गोखले, साक्षी गांधी, मधुरा देशपांडे, सुबोध भावे, ऐश्वर्या नारकर, शर्वरी जोग, आनंद जोशी, नंदिता पाटकर, मानसी नाईक, अनघा अतुल, भाग्यश्री मोटे, तितीक्षा तावडे, रेश्मा शिंदे, रेवती लेले अशा अनेक कलाकारांनी ऋतुजाला शुभेच्छा दिल्या आहेत.