देशावर करोना विषाणूचं संकट कोसळल्यामुळे गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून लॉकडाउन सुरु आहे. या काळात सारं काही बंद असल्यामुळे सहाजिकच चित्रपटसृष्टीही ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता हळूहळू अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. यातच मराठी कलाविश्वातील काही मालिका, चित्रपट यांचं अर्ध्यावर राहिलेलं चित्रीकरण पुन्हा सुरु झालं आहे. विशेष म्हणजे प्रदीर्घ अशा लॉकडाउननंतर पुन्हा काम सुरु केल्यानंतर नेमके कोणते बदल झाले आहेत हे अभिनेत्री सई ताम्हणकरने सांगितलं आहेत.
मराठी कलाविश्वातील वर्कहोलिक अशी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या आगामी रिअॅलिटी शोच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. या शोच्या सेटवर पोहोचल्यानंतर तेथील वातावरण अगदीच थक्क करणारं आणि निराळं असल्याचं सईने सांगितलं आहे.
“पुन्हा एकदा चित्रीकरणाला सुरुवात करताना मनात संमिश्र भावना आहेत. कारण अशा परिस्थितीत काम करणं हे खरंच कठीण आहे, त्यामुळे एकीकडे थोडी भीती आणि काळजी वाटते. पण पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाल्यामुळे तितकाच आनंददेखील आहे. सेटवर प्रत्येक गोष्टीची नीट काळजी घेतली जात आहे. पहिल्याच दिवशी सेटवर डॉक्टर आणि रुग्णवाहिका बोलविण्यात आली होती. सगळ्यांची नीट टेस्ट करण्यात आली. तसंच आम्ही सतत हात धुणे, सॅनिटायझर बाळगणं अशा सगळ्या गोष्टींची नीट काळजी घेत आहोत”, असं सई म्हणाली.
पुढे ती म्हणते, “या अडीच- तीन महिन्यांमध्ये प्रेक्षक तेच-तेच कार्यक्रम पाहून कंटाळले असतील. मात्र आता नव्या भागांच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे तुमचे आशीर्वाद राहु द्या”.
दरम्यान, लॉकडाउनच्या अटी थोड्या शिथिल करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीतील कलाकारांची रेलचेल वाढू लागण्याचं दिसून येत आहे. अनेक मालिका, चित्रपट, नाटक, वेबसीरिज यांचं रखडलेलं काम पुन्हा एकदा सुरु झालं आहे. विशेष म्हणजे या काळात प्रत्येक कलाकार आणि सेटवरील अन्य माणसं आरोग्याची योग्य काळजी घेत असल्याचं दिसून येत आहे.