मराठी मालिका आणि त्यानंतर चित्रपटातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव हिच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली होती. सायलीचे वडील हे आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. ३० नोव्हेंबर २०२१ ला सायलीच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. तिच्या वडिलांचे निधन होऊन सहा महिने उलटले आहेत. नुकतंच सायलीने वडिलांच्या आठवणीत एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
सायलीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सायलीने एका अंगठीचा फोटो शेअर केला आहे. या अंगठीवर तिच्या वडिलांचे संजीव असे नाव लिहिले आहे. याला तिने भावूक कॅप्शन दिले आहे.
“बाबा कायम माझ्यासोबत माझ्याजवळ असावे म्हणून त्यांनी वापरलेल्या अंगठीची मी ही अंगठी माझ्यासाठी करून घेतली. आज बरोबर ६ महिने झाले त्यांना जाऊन..I love you बाबा..”, असे सायली संजीवने म्हटले आहे. सायलीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.
“बाबा जाऊ नको दूर…”, वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्री सायली संजीवची भावनिक पोस्ट
दरम्यान वडिलांच्या निधनानंतर सायलीनं त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करताना एक इमोशनल पोस्ट शेअर केली होती. “संजीव २६/०७/१९५८ – ३०/११/२०२१. तुला माहित आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल.. या जगात सगळ्यात जास्त.. तू आयुष्य आहेस माझं. दैव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू.., शहाणी होते मी, वेडा होता तू, माझ्या साठी कारे सारा खर्च केला तू.., आज तू फेडुदे पांग हे मला, जगण्या रे मला अजूनही तूच हवा.. बाबा, थांब ना रे तू, बाबा जाऊ नको दूर…” असे तिने म्हटले होते.
‘बाबाच्या नावाची गोधडी…’ वडिलांच्या आठवणीत सायली संजीवची भावुक पोस्ट
वडिलांच्या निधनानंतर सायली संजीवनं त्यांच्यासाठी लिहिलेली ही पोस्ट त्यावेळी बरीच व्हायरल झाली होती. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत सायलीला धीर दिला होता. आता सायली या दुःखातून हळूहळू सावरत असून तिनं पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती प्रेक्षकांसोबत शेअर करत असते. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ आणि ‘पाँडेचरी’ या चित्रपटांमध्ये ती दिसली होती.