‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून सायली संजीवला ओळखले जाते. सायलीने आतापर्यंत अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. ती नेहमी विविध चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर सायलीने सिनेसृष्टीत तिचे अढळ स्थान निर्माण केले आहे. नुकतंच सायलीने तिच्या सिनेसृष्टीतील संघर्षाबद्दलच्या विविध आठवणींना उजाळा दिला आहे.
सायली संजीव ही मुळची नाशिकची आहे. नाशिकहून मुंबईत येण्याचा प्रवास, सिनेसृष्टीत काम मिळवणे, तसेच राहण्यासाठी केलेली धडपड, मुंबईतील प्रवासाचा आलेला अनुभव याबद्दल तिने वक्तव्य केले आहे. लोकमत या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने तिचे हे अनुभव सांगितले आहेत.
“मी २०१६ मध्ये नाशिकहून मुंबईत दाखल झाले. त्याआधी मी कॉलेजमध्ये अनेक एकांकिका स्पर्धेत भाग घेतला होता. त्याठिकाणी अनेक अभिनयाची पारितोषिकही मिळवली होती. एकदा एका स्पर्धेत परीक्षक म्हणून आलेल्या प्रवीण तरडे यांनी मला मुंबईत येऊन नशीब अजमावण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी काही ठिकाणी माझे नावही सुचवले होते. मात्र मला अपेक्षेप्रमाणे काम मिळत नव्हते. त्यामुळे मी पुन्हा नाशिकला परतली आणि त्यानंतर माझं बी.ए मध्ये शिक्षण पूर्ण केले. यानंतर मला ‘काहे दिया परदेस’ ही मालिका मिळाली आणि मी मुंबईकर झाले”, असे सायली संजीव म्हणाली.
“माझ्या वडिलांचा माझ्यावर प्रचंड जीव होता. मी एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आली. पण तरी माझे वडील मला नाशिकमध्ये प्रत्येक ठिकाणी सोडायला आणि न्यायला यायचे. त्यांनी कधीच मला फार कष्ट पडू दिले नाही. मी एका सुरक्षित कौटुंबिक वातावरणातून एकटीच मायानगरी मुंबईत नशीब घडवण्यासाठी आले होते. त्यावेळी मी एक गोष्ट नक्की ठरवली होती की जरी मला पैसे कमावण्यासाठी थोडी जास्त मेहनत करावी लागली तरी चालेल पण मी रिक्षा किंवा टॅक्सीशिवाय फिरणार नाही.” असेही तिने म्हटले.
“मी मुंबईत आल्यानंतर माझी मैत्रीण पल्लवी हिच्याकडे विर्लेपार्ल्यात राहत होती. त्यानंतर मी दिंडोशी फिल्मसिटीजवळ राहायला गेली. मात्र एकदा पावसाळ्यात कार्यक्रमानंतर आरे मार्गे गोरेगावला परतताना मला अत्यंत भीतीदायक अनुभव आला. यावेळी पावसामुळे वाटेत झाड पडल्यामुळे सर्वत्र वाहतूक ठप्प झाली होती. त्यावेळी त्या अनोळखी भागात मी एकटी आहे, अशी जाणीव मला झाली”, असे तिने सांगितले.
‘फुले’ चित्रपटातून उलगडणार महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची संघर्षगाथा, पहिले पोस्टर पाहिलंत का?
“त्यानंतर मी सरळ चालत हायवेपर्यंत आले. पण तिथेही काही वाहन मिळेना. यानंतर एका भल्या गृहस्थाने मला घरापर्यंत लिफ्ट दिली. त्या माणसासोबत बोलत असताना मला समजले की त्यांना माझे मालिकेतले काम खूप आवडत होते. आजही तो प्रसंग माझ्या मनात कायमचा कोरला गेला आहे. आताही माझी आरे मार्गे कुठेही जायची माझी हिंमत होत नाही”, असेही सायलीने म्हटले.
“मी मनोरंजन क्षेत्रात काम करते म्हणून मला अनेकांनी घर भाड्याने नकार दिला. तर रोज काहीतरी नवीन पदार्थ खाऊ घालणारे प्रेमळ शेजारीही मिळाले. मुंबईत तुम्हाला चांगले वाईट सर्व प्रकारची माणसे भेटतात. या शहरात नेहमी काही ना काही घडत असते. हे शहर माझ्यासारख्या अनेकांची लाइफलाइन आहे. माझ्यासाठी हे शहरच ‘गार्डियन’ आहे. याने मला सांभाळलंय. उभं केले आहे आणि पुढेही नेले आहे”, असेही सायली म्हणाली.