अभिजीत देशपांडे दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटातील काही सीन्समुळे वादंग निर्माण झालं आहे आणि एकूणच या सगळ्याला जातीय रंग देण्याचं काम राजकीय पक्षांकडून होत असल्याची चर्चा सोशल मीडिया होत आहे. या चित्रपटात अभिनेते सुबोध भावे याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
सुबोधची भूमिका काही लोकांना पटली तर काही लोकांनी यावर जोरदार टीकादेखील केली, तरी सुबोध आपल्या मतावर अगदी ठाम होता. अशाच या बेधडक व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस. सुबोध याने वेगवेगळ्या चित्रपटातून स्वतःचा ठसा या मनोरंजसृष्टीवर उमटवला आहे. सुबोधचं काम लोकांना प्रचंड पसंत पडतं. त्याची ‘तुला पाहते रे’ ही मालिका जबरदस्त हीट ठरली. आजही टीव्ही पाहणारा प्रेक्षक या मालिकेची हमखास आठवण काढतो.
आणखी वाचा : ‘बिग बॉस’च्या घरात साजिद खानच्या वर्तणूकीवरून नेटकरी संतापले; गोरी नागोरीशी वाद ठरला निमित्त
अशा या हरहुन्नरी कलाकाराला अभिनेत्री सायली संजीव हिने शुभेच्छा दिल्या आहेत. सायलीने सुबोध बरोबरचा एक फोटो शेअर करत “माझ्या आदर्श व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा” असं लिहून फोटो पोस्ट केला आहे. सायलीच्या या पोस्टवर सुबोध भावेच्या चाहत्यांनी त्याला भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत.
सुबोध भावे आता ‘मारवा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात सायली संजीव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच सुबोध लवकरच ओटीटी विश्वातही पदार्पण करणार आहे. त्याचा आगामी ‘कालसूत्र :प्रथम द्वार | मृत्यूदाता’ या वेबसीरिजचा टीझर प्रेक्षकांना चांगलाच पसंत पडला आहे. यामध्ये सुबोधबरोबर अभिनेते सयाजी शिंदेसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.