छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. मालिकेच्या सेटवरच तिने गळफास लावून जीवन संपवलं. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. वसई पूर्वेच्या कामण येथील एका स्टुडिओमधील प्रसाधनगृहात तिने गळफास घेतला. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाताळच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने सिनेक्षेत्रात खळबळ उडाली आहे. तिने आत्महत्या केल्यानंतर आता अनेक कलाकार याबद्दल प्रतिक्रिया देत आहेत.
मराठीसह अनेक हिंदी मालिकात भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्नेहा वाघला ओळखले जाते. छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ती कायमच चर्चेत असते. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर आता स्नेहाने ट्वीट करत तिला श्रद्धांजली वाहिली आहे.
आणखी वाचा : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची आत्महत्या! वसईमध्ये मालिकेच्या सेटवरच घेतला गळफास
“कधीकधी सत्यावर विश्वास ठेवणं कठीण असते. तू खूप लवकर गेलीस. RIP तुनिशा. तुझ्या कुटुंबिय आणि मित्रांप्रती मी शोक व्यक्त करते”, असे ट्वीट स्नेहा वाघने केले आहे.
आणखी वाचा : शिझान खानने मुलीचा छळ केला; तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी आईची पोलिसांत तक्रार
दरम्यान तुनिषा शर्मा ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या टिव्ही मालिकेत मुख्य भूमिका करत होती. या मालिकेचे शूटिंग वसई पुर्वेच्या कामण येथील भजनलाल स्टुडियोत सुरू होते. शनिवारी दुपारी मध्यंतरानंतर साडेतीन वाजता ती आपल्या मेकअप रूपमध्ये गेली आणि गळफास घेतला. ही बाब संध्याकाळी ५ वाजता सहकार्यांना समजली. तिला वसईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिने आत्महत्येपूर्वी कुठलीही चिठ्ठी लिहिलेली नव्हती.
मीरा रोड येथे राहणार्या तुनिषाचे अभिनेता मोहम्मद शिझान याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्याने प्रेमसंबंध तोडल्याने ती निराश झाली होती. दोन दिवसांपासून ती नैराश्यात होती अशी तक्रार तुनिषाच्या आईने दिली होती. त्या तक्रारीवरून आम्ही शिझानच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून रात्री उशिरा अटक केली, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली.