अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्राजक्ता माळी यांनी ‘हंपी’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ‘लोकसत्ता लाईव्ह चॅट’ला हजेरी लावली होती. यावेळी दोघींनीही प्रेक्षकांच्या प्रश्नांची धमाल उत्तरे दिली. काही महत्त्वाच्या विषयांवर आणि ‘हंपी’ चित्रपटाशी निगडीत प्रश्नही प्राजक्ता आणि सोनालीला विचारण्यात आले. पण यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी प्रश्न ठरला तो म्हणजे या दोन्ही अभिनेत्रींच्या लग्नाचा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या या दोन्ही अभिनेत्री कधी लग्न करणार असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देत प्राजक्ताने लगेचच आपण चार वर्षांनंतर लग्न करणार असल्याचे जाहीर केले. ‘लग्नसंस्कृतीवर माझा पूर्ण विश्वास असून, चार वर्षांनी मी लग्न करणार आहे. किंबहुना मी हे माझ्या कुटुंबियांनाही सांगितले आहे’, असेही तिने स्पष्ट केले. सोनाली मात्र या प्रश्नाचे उत्तर देताना काहीशी संकोचलेली दिसली. त्यावेळी प्राजक्तानेच सोनालीच्या वतीने उत्तर देत ती येत्या एक- दीड वर्षात विवाहबंधनात अडकू शकते असे स्पष्ट केले. प्राजक्तानेही याबद्दलची फारशी माहिती उघड न करता, सोनालीच्या लग्नाविषयी आपल्यालाही सूत्रांमार्फत कळल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता या दोन्ही अभिनेत्रींच्या लग्नाविषयीच्या चर्चांना उधाण येण्याची चिन्हे आहेत असेच म्हणावे लागेल.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

हल्लीच्या मुलींचे आयुष्य आणि लग्नाकडे पाहण्याचा त्यांचा एकंदर दृष्टीकोन याविषयी सांगताना प्राजक्ता म्हणाली, ‘या सर्व गोष्टी व्यक्तीसापेक्ष आहेत. करिअरवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मुली शहरात आढळतात. पण, ग्रामीण भागात हे प्रमाण तुलनेने कमी आहे. वयाच्या कोणत्या टप्प्यावर लग्न करायचे हा प्रत्येकाचा खासगी प्रश्न आहे.’ तर, समाजात काही गोष्टी बदलू लागल्या आहेत. स्वातंत्र्य, आर्थिक स्थैर्य या सर्व गोष्टींबद्दल महत्त्व वाढले आहेत. त्यामुळे लग्नाविषयीच्या संकल्पनाही बदलल्या असल्याचे सोनाली कुलकर्णीने स्पष्ट केले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress sonalee kulkarni and prajakta mali on their marriage plans