मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख करणारी अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते. सोनाली कुलकर्णी ही कायमच चर्चेत असते. सोनालीने मराठी प्रेक्षकांसोबतच देशभरातील प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. सध्या ती तिच्या धारावी बँक या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरिजमध्ये तिने मुख्यमंत्री जान्हवी सुर्वे ही भूमिका साकारली आहे. नुकतंच तिने एका मुलाखतीत ‘धारावी बँक’ ही वेब सीरिज निवडण्यामागचं कारण काय? याबद्दल सविस्तर उत्तर दिलं.
धारावी बँकच्या निमित्ताने सोनाली कुलकर्णीने महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी तिने धारावी बँक, नाटक, ओटीटी यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी तिला ‘धारावी बँक’ ही वेब सीरिज निवडण्यामागचं कारण काय? असा प्रश्न विचारला. त्यावर ती म्हणाली, “दिग्दर्शक समित कक्कड हे त्याचे एकमेव कारण आहे. जर समित दिग्दर्शक नसता तर तो उत्तम वकील किंवा मानसोपचारतज्ज्ञ झाला असता. त्याच्याकडे कमालीची ‘कन्व्हिन्सिंग पॉवर’ आहे.”
आणखी वाचा : “फक्त ६ दिवस शिल्लक…” राणादा- पाठकबाईंच्या लग्नाची तारीख समोर
“त्याबरोबरच या वेबसीरिजमधील माझी भूमिका ही मुख्यमंत्री जान्हवी सुर्वे अशी आहे. ही भूमिका माझ्या खऱ्या आयुष्याच्या विरुद्ध आहे. माझी कलाकार म्हणून असलेली प्रतिमा काहीशी निरुपद्रवी आहे. मी कोणाला त्रास देत नाही. मिळून मिसळून मला काम करायला आवडतं. पण, कथानकात माझी भूमिका ही प्रचंड महत्त्वाकांक्षी असून समोरच्या व्यक्तीकडून काम करून घेण्याची तिच्याकडे अधिकारवाणी आहे. या भूमिकेतील हीच गोष्ट मला अधिक आवडली.” असेही तिने सांगितले.
यावेळी ‘तिला तुझे नवीन नाटक कधी पाहायला मिळणार आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने फार स्पष्टपणे उत्तर दिले. “सध्या मी माझ्या हातात जे आहे, त्याला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ या माझ्या नाटकाचा अमेरिका दौरा येत्या दिवसांत ठरला आहे. त्यामुळे त्या प्रयोगांना मला वेळ द्यायचाय. यामुळे एखाद्या नव्या नाटकाची स्क्रिप्ट किंवा त्याचे वाचन करण्याचा मोह मी टाळला आहे. कारण जर मी एखादं नाटक वाचलं आणि ते मला आवडलं तर मी नकार देऊ शकणार नाही, याची मला खात्री आहे.”
“मला एकवेळ मानधन मिळालं नाही तर चालेल पण नाटकाला नकार देणं हे कायम माझ्यासाठी त्रासदायक असतं. येत्या २०२३ मध्ये मी एखादं नवं नाटक करण्याचा प्रयत्न करत आहे”, असे सोनाली कुलकर्णी म्हणाली.
आणखी वाचा : “मी गायब झालोय असं रोज वाचनात येतं पण…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंतने सांगितली सत्य परिस्थिती
दरम्यान ‘धारावी बँक’मध्ये ‘थलाईवन’च्या भूमिकेत अभिनेता सुनील शेट्टी आहे, तर त्याच्या मागावर असलेला जेसीपी जयंत गावस्कर हा पोलीस अधिकारी बनलाय अभिनेता विवेक ओबेरॅाय. सोनाली कुलकर्णी, नागेश भोसले, फ्रेडी दारूवाला, सिद्धार्थ मेनन, चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर, जयवंत वाडकर शांती प्रिया, ल्यूके किनी, वामशी कृष्णन, भावना राव, समीक्षा भटनागर, श्रुती श्रीवास्तव, हितेश भोजराज, पवित्रा सरकार, रोहित पाठक आदी कलाकार ‘धारावी बँक’ या वेबसिरीजमध्ये आहेत.