मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या निखळ हास्याने साऱ्यांना मोहित करणारी अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या सूर नवा ध्यास नवा या रिअॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडत आहे. स्पृहाने आतापर्यंत नाटक, मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता तिच्याच पावलावर पाऊल ठेवत तिचा नवरादेखील चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.
स्पृहाचा आगामी ‘होम स्वीट होम’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या माध्यमातून तिचा नवरा वरद लघाटेदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील ‘इकडून तिकडे’ ह्या गाण्यातून तो पहिल्यांदाच चित्रपटामध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे हे गाणं युट्यूबवर प्रदर्शित झाले आहे.
‘इकडून तिकडे हे गाणं माझ्यावर चित्रीत झालं असून अजय गोगावले यांचा आवाज या गाण्याला लाभला आहे. मी मुळातच अजय-अतुल यांच्या संगीताची चाहती आहे. त्यामुळे माझ्या गाण्यासाठी त्यांचाच आवाज मिळाल्यामुळे मी प्रचंड खूश आहे. त्यातच भर पडली आहे ती माझ्या नवऱ्याची. माझा नवरादेखील या गाण्यात आल्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे, असं स्पृहा म्हणाली.
पुढे ती असंही म्हणाली, ‘इकडून तिकडे’ गाण्यामध्ये वरद गेस्ट अपिअरन्स म्हणून झळकणार आहे. वरद अनेक वेळा मला आणि माझ्या फिल्ममेकर्सना मस्करीत म्हणायचा की मला एक गेस्ट अपिअरन्स करायचा आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने त्याची इच्छा पूर्ण झाली.