लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या झांसीमध्ये आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.मात्र हे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ती लवकरच मुंबईमध्ये परत येणार आहे. विशेष म्हणजे मुंबईमध्ये आल्यानंतर स्पृहा सर्वप्रथम पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानात सहभागी होणार आहे. तिच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील इतरही काही कलाकार सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाणी फाऊंडेशनतर्फे १ मे रोजी होणाऱ्या श्रमदानासाठी स्पृहा जाणार असून यावेळी तिने गेल्यावर्षी केलेल्या श्रमदानातील अनुभवही शेअर केला. “मुंबई-पुण्यातल्या सुखावह ठिकाणी आयुष्य जगत असताना, या शहरांबाहेरील ठिकाणी राहणाऱ्या गाव-पाड्यामध्ये पाण्यासाठी तेथील महिलांना वणवण फिरावं लागतं. पाण्यासाठी येथील नागरिकांची काय अवस्था आहे हे पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून मला समजलं”, असं स्पृहा म्हणाली.

पुढे ती म्हणते, “पाणी फाऊंडेशनसोबत, दुष्काळाशी दोन हात करताना, पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन संघटित होणारे, जातव्यवस्था निर्मुलन होऊन एकमेकांमधले पिढ्यानपिढ्यांचे मतभेद विसरून, एकत्र पंगतीला बसणारे गावकरी मी पाहिलेत. मोठ्या शहरात राहणारी सुखवस्तू कुटूंबातली उच्चशिक्षित मुलं, गावात येऊन कुदळ-फावडे घेऊन उन्हात घाम गाळताना पाहताना, इंडिया भारतात परतल्याचा सुखद अनुभव मिळतो. पाणी फाऊंडेशनची मोहिम आता चळवळ झालीय. पाणी फाउंडेशनसाठी काम करताना नैसर्गिक आपत्तीवर आपण मात करण्याचा आनंद गावकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मला दिसून आलाय. या आनंदात मीही सहभागी असल्याचे समाधान काही आगळेच असते. गेल्यावर्षी मी एकटीच श्रमदानासाठी गेले होते. पण यंदा मी माझ्या आई आणि काकूसोबत श्रमदानात सहभागी असेन.”

स्पृहा जोशी गेल्यावर्षी पुरंदर तालुक्यातल्या पोखर या गावात श्रमदानासाठी गेली होती. या श्रमदानाव्यतिरिक्त पाणी फाऊंडेशनने राबविलेल्या अन्य काही उपक्रमांमध्येही तिने सक्रीय सहभाग घेतला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress spruha joshi will support aamir khan paani foundation