‘झी मराठी’वरील ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सध्या घराघरात लोकप्रिय झाला आहे. या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. फक्त सिनेसृष्टीत नव्हे तर राजकीय पातळीवरही हा कार्यक्रम चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक कलाकारासह राजकीय क्षेत्रातील आघाडीच्या महिला नेत्यांनी हजेरी लावली आहे. अमृता फडणवीस, पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, किशोरी पेडणेकर या राजकीय क्षेत्रातील आघाडीच्या महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यासह अमृता खानविलकर, मेधा मांजरेकर, ऋता दुर्गुळे, सई ताम्हणकर यांनी देखील कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यानंतर आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत खाष्ट सासू म्हणून आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. माहेरची साडी या मराठी चित्रपटामुळे त्या घराघरात प्रसिद्ध झाल्या. एक बिनधास्त्र, मोकळ्या मनाची आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी मराठी, हिंदीत वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आहेत. या कार्यक्रमात उषा नाडकर्णी यांनी नवोदित येणाऱ्या अभिनेत्रींचे कान टोचले आहेत.
आणखी वाचा : तब्बल २६ वर्षांनंतर अभिनेत्री मंदाकिनीने केले मानधनातील तफावतीवरुन भाष्य, म्हणाली “आम्हाला फक्त…”
बस बाई बस या कार्यक्रमात सुबोध भावेने उषा नाडकर्णींना नवोदित अभिनेत्रींबद्दल एक प्रश्न विचारला होता. ‘नवोदित अभिनेत्रींनी इतर गोष्टींपेक्षा अभिनयाकडे जास्त लक्ष द्यावं असं वाटतं का?’ असा प्रश्न सुबोधने त्यांना विचारला होता. त्यावर त्यांनी हो असे म्हटले.
आणखी वाचा : “निरोप घेताना ऊर भरून आलाय…” ‘देवमाणूस २’ मालिकेच्या निर्मातीची भावूक पोस्ट
“नवीन आलेल्या ज्या अभिनेत्री आहेत. त्यांना आपण अभिनय कसा करावा याबद्दल काहीही पडलेलं नसतं. मी किती सुंदर दिसेन, माझी लाली कोणत्या रंगाची आहे, कोणता ब्रँड आहे, मग तू ही लिपस्टिक कधी घेतली, त्याचे इतके पैसे आहेत, असं बोलतात आणि जेव्हा करायला उभं राहतात तेव्हा बोंबलतात. पण त्या आपण मोठ्या नट्या असं दाखवतात”, अशा शब्दात उषा नाडकर्णींनी नवीन येणाऱ्या अभिनेत्रींचे कान टोचले.
दरम्यान ‘माहेरची साडी’ हा मराठी चित्रपट आणि ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेद्वारे उषा नाडकर्णींना सर्वत्र ओळखले जाते. खाष्ट सासू म्हणून त्यांनी त्यांच्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली आहे. वयाची सत्तरी ओलांडलेल्या उषा नाडकर्णी यांनी ‘बिग बॉस मराठी’मध्येही सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी या मंचावरही फार धमाल केली होती. उषा नाडकर्णी यांनी चार दशकांहून अधिक काळ मराठी, हिंदीत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.