केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. ३० जूनला हा सिनेमा प्रदर्शित झाला असून, गेले काही दिवस चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यग्र होती. अलीकडेच चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रींनी एका मुलाखतीला हजेरी लावली होती. या वेळी अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी २५ वर्षांपूर्वी घडलेला किस्सा आपल्या चाहत्यांना सांगितला.
हेही वाचा : सारा अली खानने आई अमृता सिंहबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाली, “माझा चित्रपट…”
अमेरिकेमध्ये नाटकाच्या दौऱ्यावर असताना साधारण २५ वर्षांपूर्वी इस्त्रीवर पापड भाजले होते याविषयी ‘प्लॅनेट मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगताना वंदना गुप्ते म्हणाल्या, जवळपास २५ वर्षांपूर्वी आम्ही नाटकासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलो होतो तेव्हा तिकडे फारसे शाकाहारी पदार्थ मिळायचे नाहीत. आमच्याबरोबर ४ ते ५ जण शुद्ध शाकाहारी होते म्हणून इथून जाताना आम्ही पाच राईस कुकर घेतले होते. त्या कुकरमध्ये मी सर्वांसाठी खिचडी बनवायचे. आता खिचडी बनवल्यावर सर्वांनाच पापड लागायचे पण, पापड कुठे भाजायचे असा प्रश्न होता. तेव्हा सुद्धा आजसारखे हॉटेल रुममध्ये फायर अलार्म वाजायचे त्यामुळे सगळेजण गुपचूप जेवण बनवायचे.
वंदना गुप्ते पुढे म्हणाल्या, “थोडक्यात पापड कसा भाजणार हा प्रश्न निर्माण झाला होता म्हणून मी इस्त्रीवर पापड ठेवला, पण तो पापड इस्त्रीला चिकटला. त्यानंतर इस्त्रीवर एक कागद ठेवला त्यानेही काही उपयोग झाला नाही. शेवटी मेकअप दादाने दिलेली मलमल ठेवली आणि त्यावर इस्त्री फिरवून सर्वांसाठी पापड भाजले.”
हेही वाचा : “अपनेवाले घर की खिडकी…”, सिद्धार्थ-मितालीच्या नव्या घराला एक वर्ष पूर्ण; अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच याबरोबरच अभिनेते शरद पोंक्षे, पियुष रानडे यांच्याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत.