समीर जावळे

“हसवण्याचा गुण एवढंच भांडवल देऊन ब्रह्मदेवाने इहलोकी आमची रवानगी केलेली दिसते. उद्या वर गेल्यानंतर ब्रह्मदेवाने मला विचारलं की वत्सा पुरुषोत्तमा, तुला हे भांडवल देऊन मी खाली पाठवलं. त्यातून तू लोकांना काय दिलंस ते मला कथन कर. तर मी त्या ब्रह्मदेवाला सांगेन की मी लोकांना काय दिलं याचा मी हिशोब ठेवलेला नाही. पण लोकांनी मला जे दिलं ते मिळणं तुम्हा देवांच्या बापाच्याही नशिबात नाही. लोकांनी मला त्यांच्याजवळची बहुमोल गोष्ट दिली आहे ती म्हणजे त्यांचं हास्य.” पुलं स्वतःच एका मुलाखतीत हे म्हणाले होते. त्यांचं हे म्हणणं किती अस्सल होतं याची प्रचिती ही वाक्यं त्यांच्या तोंडून ऐकताना येतेच.

पु.लंनी जन्माला घातलं ‘स्टँडअप’

आपल्या सूक्ष्म निरीक्षणाने सगळं चित्र डोळ्यांसमोर उभं करणारा हा अवलिया. त्यांच्या नावापुढे फक्त कैलासवासी पुलं हे बिरुद काही कुणाला आवडलं नाही. बाकी कोट्यधीश पुलं, महाराष्ट्राचे लाडके पुलं अशी कितीतरी बिरुदं त्यांना लागली त्यांनी ती स्वीकारलीही. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं अतोनात प्रेम मिळालं. ‘स्टँड अप’ हा प्रकार पुढे इतका लोकप्रिय होईल हे कुणाला ठाऊकही नव्हतं. पण तो रुजवणारे किंवा त्याचे जनक म्हणजेच पु.ल. देशपांडे.

Bollywood singer udit Narayan desires for bharat ratna amid Kissing Scandal, Says He Has No Regret
उदित नारायण यांनी भारतरत्न मिळण्याची इच्छा केली व्यक्त, व्हायरल व्हिडीओबाबत म्हणाले, “मला पश्चाताप झाला नाही”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mahakumbh mela man walking from outside of the bridge shocking stunt video viral
“अरे, स्वत:च्या जीवाची तरी पर्वा करा”, कुंभमेळ्यात माणसाने जे केलं ते पाहून बसेल धक्का, VIDEO एकदा पाहाच
Shahid Kapoor
“माझंच नशीब…”, शाहिद कपूरने ‘विवाह’ चित्रपटातून त्याला काढून टाकण्याची केलेली विनंती; खुलासा करत म्हणाला…
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
जखमी सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाला किती बक्षीस मिळालं? म्हणाला, “माझ्यासाठी तो…”
Ram Gopal Varma Gets Emotional after watching satya movie 27 years
“कंठ दाटून आला अन्…”, २७ वर्षांनंतर ‘सत्या’ चित्रपट पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची ‘अशी’ झाली होती अवस्था; म्हणाले, “यशामुळे आंधळा…”

पुलंचं साहित्य म्हणजे आपल्याशी होत असलेल्या संवादासारखं

‘रावसाहेब’ या त्यांच्या कथेत ते म्हणतात, “एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंथ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये याला काही उत्तर नाही.” हे वाक्य अगदी खऱ्याखुऱ्या रावसाहेबांबद्दल म्हणजेच बेळगावच्या कृष्णराव हरिहरांबद्दल त्यांनी लिहिलंय. नाटक, सिनेमा, कथा लेखन, कथा-कथन, कविता, संगीत, कादंबरी, प्रवास वर्णनं अशा विविध कलाप्रकारांमध्ये स्वच्छंदपणे वावरणाऱ्या पुलंची नाळ महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांशी जोडली गेली होती, ती अजूनही कायम आहे. आईपासून नाळ तोडल्यावर मूल वेगळं होतं. पण ते आईला कधीच विसरत नाही. आपल्या आईला आपण जसं लक्षात ठेवतो अगदी तसंच महाराष्ट्राने पुलंचं साहित्य लक्षात ठेवलं आहे.

पुलं म्हणायचे मी विदूषक, गायक आणि लेखक

“एक विदूषक, एक गायक आणि एक लेखक फार लहानपणापासून माझ्या मनात दडून आहेत. त्यातला कोण, केव्हा माझ्यात संचार करेल हे मलाही सांगता येत नाही. या तिन्ही प्रवृत्तींना वाव मिळावा अशाच घरात माझा जन्म झाला. मी या जगात गुपचूप आलो, हो मी रडलोच नाही. सुईणीने माझ्या कपाळावर सुईचा चटका दिला, हातावर चटका दिला तेव्हा मी कुठे रडलो जे मुंबईतल्या गावदेवीभर ऐकू गेलं. अशा पद्धतीने जन्म झाल्यानंतर माझ्या रडण्याचंच हसू झालं. माझ्या कपाळावर तो डाग अजूनही आहे. पण मूळच्या रंगात तो मिसळून गेल्याने दिसत नाही. लहानपणी मी गोरा असताना तो दिसत असे असं आई सांगत असे.” हे वर्णनही पु. लंनीच केलं आहे. त्यांच्या जन्माची ही छोटीशी कथा ऐकूनही आपल्याला हसू येतंच. पुलंनी या मुलाखतीत सखाराम गटणे कथेचा जन्म कसा झाला तेदेखील सांगितलं.

..आणि सखाराम गटणे कथेचा जन्म झाला

“मी, साहित्य, संगीत, नाट्य या कला या माझ्या आनंदासाठी जोपासल्या. त्याची कठोर साधना वगैरे काही केलीत नाही. त्यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या असं झालेलं आहे. लोक शिष्टाचार म्हणून अष्टपैलू वगैरे म्हणत असावेत. माझ्या एका वाचकाने पत्र पाठवून मला विचारलं होतं की तुमची साहित्यसाधनेची वेळ कुठली? खरंतर माझं साहित्य वाचल्यानंतर मी साधना किंवा ज्ञानोपसना करत असेन अशी त्या वाचकाला शंका कशी आली माहीत नाही. पण त्यातूनच सखाराम गटणे या व्यक्तिचित्राचा भयंकर साहित्यिक भाषेतून जन्म झाला.” असं पुलंनी सांगितलं होतं.

पुलंना भेटलेल्या वल्ली

सखाराम गटणे, नामू परिट, नारायण, अंतू बर्वा, हरितात्या, नंदा प्रधान, लखू रिसबूड, अण्णा वडगावकर, चितळे मास्तर ही सगळी पात्र आपल्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकात भेटतात. ती वाचत असताना किंवा ऐकत असताना आपण तिथे उभे आहोत आणि त्या वल्लींना पाहतो आहोत की काय असा भास काही क्षणांसाठी होतो. पुलंच्या शब्दांची ताकद इथे दिसते. नामू परिट हा भामटा असूनही कसा भोळेपणाचा वाव आणतो याचं वर्णन पुलं “सदैव कपड्यांच्या दुनियेत वावरलेला इतका नागवा माणूस मी पाहिला नाही.” या एका वाक्यात किती चपखलपणे करतात. तसंच अंतू बर्वा या कथेतले प्रसंगही तसेच्या तसे लक्षात राहतात. रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरुष राहतात. “देवाने ही माणसांची निराळीच घडण केली आहे. त्यांच्यात रत्नागिरीच्या लाल चिऱ्याचे, नारळा-फणसाचे, खाजऱ्या आळवाचे आणि फट म्हणता प्राण कंठाशी आणणाऱ्या ओल्या सुपारीचे गुण अगदी एकवटून आहेत.” ही सुरुवातच कोकणातल्या माणसाचं दर्शन आपल्याला घडवते. तर “अंतूशेट, रत्नागिरी झकपक झाली हो तुमची! विजेचे दिवे आले. तुमच्या घरी आली की नाही वीज? छे हो. काळोख आहे तो बरा आहे. उद्या झकपक प्रकाश पडला तर बघायचं काय दळिद्रच ना? अहो पोपडे उडालेल्या भिंती नी गळकी कौलं बघायला वीज कशाला? आमचं दळिद्र काळोखात दडलेलं बरं.” यातून पुलं. त्या काळातली अंतूशेठची आणि कमी अधिक फरकाने त्यांच्या वयाच्या सगळ्यांचीच परिस्थिती सांगून जातात. सखाराम गटणेमध्ये पु.ल. म्हणतात की “सखाराम बोलायला लागला की त्याच्या तोंडात दातांऐवजी छापखान्यातले खिळे बसवलेत की काय? असं मला वाटून गेलं.” प्रत्येक विनोदी कथेला काहीशी कारुण्याची झालरही त्यांच्या लेखनात आढळून येते.

‘ती फुलराणी’, ‘तीन पैशांचा तमाशा’, ‘तुका म्हणे आता’, ‘तुझे आहे तुजपाशी’ ही त्यांची नाटकंही स्मरणात आहेतच. ती फुलराणीतला तुला शिकवीन चांगलाच धडा हे स्वगत तर अनेक महाविद्यालयांच्या गॅदरिंग्जमधून आवर्जून सादर होताना दिसतं. म्हैस या त्यांच्या कथेत तर पुलं. फक्त शब्दांमधून संपूर्ण बस त्यातले प्रवासी, ड्रायव्हर, कंडक्टर हे उभे करतात. आपण ती कथा वाचताना किंवा ऐकताना त्या म्हशीचा अपघात आपणही आत्ताच पाहिला आहे असं वाटतं आणि ती सगळी कॅरेक्टर्स आपल्याला भेटतात. पुलंच्या लेखणीची कमालच ही आहे की ते प्रत्यक्ष त्या त्या व्यक्तीशी भेट घडवून आणतात. त्यांचं कथाकथनही संवाद साधणंच होतं. अशा या हरहुन्नरी माणसाने आपल्याला खूप काही दिलं, समृद्ध केलं आहे. रावसाहेब या कथेतलं त्यांचं वाक्य पुलंच्या बाबतीतही मनोमन पटतंच. “आमची छोटीशी जीवनं समृद्ध करण्यासाठी देवाने दिलेल्या या देणग्या.. न मागता दिल्या होत्या न सांगता परत नेल्या. ” पुलंनी कायमच हसवलं, ते गेले त्याला २४ वर्षे पूर्ण झाली आहेत पण त्यांच्या कथांमधून, पुस्तकांमधून ते आपल्यात आहेत असाच भास होतो. पुतळे वगैरे उभारण्याच्या ते विरोधात होते त्यावरही त्यांनी खूप सुंदर भाष्य केलं होतं.

“समजा उद्या माझे पुतळे वगैरे करायचं ठरवलं.. देव करो आणि असं न होवो. कारण पुतळा हे आपल्या देशात कावळ्यांचं शौचकूप असतं. पण समजा माझा पुतळा करायचं ठरवलं तर मी त्याच्या खाली इतकंच लिहा असं सांगेन की या माणसाने आम्हाला हसवले.” खरंच पुलं, तुम्ही हसवलंत, हसवत आहात, हसवत राहाल!

Story img Loader