सध्या लागोपाठ प्रदर्शित झालेल्या हिंदी वेबमालिकांमधून सोनाली कुलकर्णी, अभय महाजन, सई ताम्हणकर, आदिनाथ कोठारे असे मराठीतील नावाजलेले कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. सई ताम्हणकर आणि आदिनाथ कोठारे हे दोघंही सध्या ‘झी ५’ वाहिनीवरील ‘क्राइम बीट’ या वेबमालिकेतून प्रेक्षकांसमोर आले आहेत. यानिमित्ताने बोलताना मराठीतही अनेक विषयांवर वेबमालिका होऊ शकते, मात्र मराठीसाठी पूर्णपणे सशक्त ओटीटी माध्यमाची गरज आहे, असे मत सई ताम्हणकरने व्यक्त केले. तर पहिल्यांदाच हिंदी वेबमालिकेत इन्स्पेक्टरची भूमिका करणाऱ्या आदिनाथने दिल्लीची भाषा आणि तिथला पोलीस अधिकारी साकारणे आव्हानात्मक होते, असे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दर्जेदार मनोरंजनाची मेजवानी

दिल्लीतील गुन्हेगारी, पोलीस आणि पत्रकार ही तिन्ही क्षेत्रं एकमेकांशी कशा प्रकारे निगडित आहेत, तसेच एकमेकांवर कसे अवलंबून असतात, हे खूपच प्रभावीपणे ‘क्राइम बीट’ या वेबमालिकेतून मांडण्यात आले आहे. दिग्दर्शक सुधीर मिश्रा आणि संजीव कौल यांनी वेबमालिकेची उत्तम बांधणी केली आहे. उत्कृष्ट कलाकार, दिग्दर्शक – निर्माते आणि तंत्रज्ञांद्वारे दर्जेदार मनोरंजनाची मेजवानी ‘क्राइम बीट’ वेबमालिकेतून प्रेक्षकांना दिली आहे, असे आदिनाथ कोठारेने सांगितले.

वास्तवाशी मिळतीजुळती मांडणी

‘क्राइम बीट’चे कथानक हे ‘द प्राइस यू पे’ या पुस्तकावरून प्रेरित होऊन अतिशय सुंदर लिहिलेले आहे. कथा तसेच व्यक्तिरेखा काल्पनिकदृष्ट्या बांधलेल्या आहेत, मात्र वेबमालिकेची मांडणी ही वास्तवाशी मिळतीजुळती केलेली आहे. त्यामुळे ही वेबमालिका पाहताना व्यक्तिरेखा सभोवतालच्या वाटतील. लेखक – दिग्दर्शकांनी ‘क्राइम बीट’च्या माध्यमातून गुन्हेगारी क्षेत्र व संबंधित क्षेत्राशी निगडित अतिशय उत्कृष्ट थरारपट मांडलेला आहे, असे आदिनाथ कोठारे म्हणाला.

संहितेचा प्रामुख्याने विचार

एखाद्या भूमिकेची निवड करताना नेहमी संहितेचा प्रामुख्याने विचार केला जातो, तसेच कलाकृतीच्या संपूर्ण कथेत आपल्या भूमिकेचा केवढा वाटा आहे, हे पाहिले जाते. यानंतर संबंधित भूमिकेच्या प्रवाहाला धरून काम करणे, माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणत्याही कलाकृतीची निवड करताना जाणीवपूर्वक मी या गोष्टींचा विचार करते, असे सई ताम्हणकर हिने स्पष्ट केले.

दिल्लीतील भाषा बोलणे आव्हानात्मक

दिल्लीस्थित डीसीपी मयंक ही पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणे माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. दिल्लीतील माणसांची भाषा, बोलण्याची शैली आणि आवाजातील चढ – उतार वेगळे असतात. त्यामुळे या सर्व गोष्टी अंगवळणी आणणे, माझ्यासाठी कठीण होते. ‘क्राइम बीट’ वेबमालिकेतील बहुतांश कलाकार हे मूळचे दिल्लीचे असल्यामुळे त्यांच्यासाठी भाषा दैनंदिन जीवनातील होती, परंतु मला व्यवस्थित भाषा जमली नाही तर माझी व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खटकू शकते. मात्र हे सर्व जुळवून आणण्यासाठी दिग्दर्शक – निर्माते यांनी मदत केली. साकिब सलीम, राजेश तेलंग आदींनी सहकार्य केले आणि दिल्लीतील बोलण्याच्या शैलीबाबत सराव करून घेतला. त्यामुळे मला खास दिल्लीकरांची भाषा व्यवस्थित बोलता आली, हे माझ्यासाठी महत्त्वाचे होते, अशी भावना आदिनाथ कोठारे याने व्यक्त केली.

वैविध्यपूर्ण भूमिका केल्याचा आनंद

मी आजवर हिंदीत झगमगाट, रहस्य, थरार, भावभावना, प्रेम असे विविध पैलू एकाच व्यक्तिरेखेत असलेली अर्चना पांडेसारखी नायिकेची भूमिका केलेली नव्हती. त्यामुळे वैविध्यपूर्ण भूमिका केल्याचा मला आनंद आहे. तसेच सुधीर मिश्रा आणि संजीव कौल यांच्यासारखे दिग्गज दिग्दर्शक असतात, तेव्हा आपल्याला फार तयारी करावी लागत नाही. एक कलाकार म्हणून तुम्हाला त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा करून सर्व समजून घ्यावे लागते आणि त्यानंतर दिग्दर्शक तुम्हाला तुमच्या पात्रापर्यंत व्यवस्थित नेऊन पोहोचवतात. अर्चना पांडे या व्यक्तिरेखेचा अभ्यास करण्यासाठी मला तिची कथा देण्यात आली होती आणि त्यामुळे मला खूप मदत झाली. ग्लॅमरस असणारी ही भूमिका हिंदी वेबमालिकेत साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते, पण हे आव्हान यशस्वीरीत्या पेलल्याचा मला आनंद आहे. तसेच आम्ही कलाकार आणि माध्यमे नेहमीच एकमेकांच्या संपर्कात असतो, त्यामुळे या वेबमालिकेची कथा जवळची वाटते, असे सई ताम्हणकर हिने सांगितले.

साकिब सलीम याचे पॅकअप होऊन तो हॉटेलवर गेल्यानंतरही त्याने मला संवाद हे दिल्लीतील हिंदी भाषेतून कसे बोलायचे, हे फोनवरून सांगितले. त्यामुळे चित्रीकरण करताना मजा आली. डीसीपी मयंक साकारणे आव्हानात्मक होते. या व्यक्तिरेखेला अनेक पैलू आहेत. एखाद्या गुन्ह्याचा तपास करीत असताना स्वत:च्या बापाला कोणी मारले याचे धागेदोरे सापडल्यानंतर बापाला न्याय देणे आणि या दरम्यानच्या भावभावनांचा प्रवासही या भूमिकेत आहे. या सर्व गोष्टी मला जुळवून आणायच्या होत्या. त्यासाठी लेखक – दिग्दर्शकांनी खूप सुंदररीत्या ही व्यक्तिरेखा मला समजावली आणि या संपूर्ण प्रवासात बरेच काही शिकायला मिळाले, असे आदिनाथ कोठारे याने सांगितले.

मराठी वेबमालिकांना प्रेक्षकांनी सहकार्य करावे…

माझी मराठीतील पहिली वेबमालिका ‘डेट विथ सई’ ही ‘झी फाइव्ह’ या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाली होती. एका वेगळ्या विषयावर आधारित असणाऱ्या या कलाकृतीसाठी ‘झी फाइव्ह’ आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे पुन्हा ‘झी फाइव्ह’सोबत नव्या वेबमालिकेसाठी काम करण्याचा आनंद आहे. मराठीत मी अभिनय केलेल्या ‘डेट विथ सई’, ‘पेट पुराण’, ‘मानवत मर्डर्स’ आणि इतर वैविध्यपूर्ण वेबमालिका आहेत. परंतु आपल्याकडे वेबमालिकेची निर्मिती करणारी कमी माध्यमे असल्यामुळे ही प्रक्रिया संथगतीने चालते. आपल्याकडे खूप वेगळे विषय आहेत. संपूर्णत: मराठीला वाहिलेले एक सशक्त ओटीटी माध्यम तयार व्हायला हवे, त्यामुळे या ओटीटी माध्यमावर वैविध्यपूर्ण विषयांवर सातत्याने मराठी वेबमालिका येत राहतील. तसेच प्रेक्षकांनीही मराठी वेबमालिकांना सहकार्य करावे, असे आवाहन सई ताम्हणकर हिने केले.