मुंबई : ‘हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रामुख्याने प्रसिद्ध कलाकारांवर लक्ष केंद्रित करून चित्रपटांची निर्मिती केली जाते, परंतु मराठी चित्रपटसृष्टीत नवोदित चेहऱ्यांवर लक्ष केंद्रित करून वैविध्यपूर्ण आशयघन चित्रपटांची निर्मिती केली जाते. आजवर मराठी प्रेक्षकांनी नवोदित कलाकारांना स्वीकारले असून त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये गर्दीही होते. मराठी प्रेक्षकांना उत्तम चित्रपट ओळखण्याची समज आहे’, अशा शब्दांत प्रेक्षक चित्रपटगृहात येत नसल्याने मराठी चित्रपटांना प्रतिसाद मिळत नाही हे म्हणणे ‘झापुक झुपूक’ चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या जिओ स्टुडिओज मराठीचे आशय प्रमुख निखिल साने यांनी खोडून काढले.

‘बिग बॉस मराठी’मुळे घराघरात पोहोचलेल्या सूरज चव्हाण याला घेऊन ‘झापुक झुपूक’ सारखा चित्रपट करण्याचे धाडस दाखवणाऱ्या दिग्दर्शक केदार शिंदे यांचे कौतुक आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही निखिल साने यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला. सध्या सगळीकडे चर्चेत असलेल्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे, जिओ स्टुडिओज मराठीचे आशय प्रमुख निखिल साने, अभिनेता सूरज चव्हाण, अभिनेत्री जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे या कलाकारांच्या चमूने ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट देऊन मनमोकळा संवाद साधला. हा चित्रपट शुक्रवारी, २५ एप्रिलपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

‘मराठी चित्रपटसृष्टीत नवोदितांच्या कलागुणांना चालना देणे आणि आशयघन चित्रपटांची निर्मिती करून वैविध्य जोपासण्याची परंपरा आजही टिकून आहे. ‘फँड्री’, ‘किल्ला’, ‘टाइमपास’, ‘सैराट’ आदी विविध चित्रपटांमधून नवोदित चेहरे समोर आले आणि मराठी प्रेक्षकांनी नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देऊन संबंधित चित्रपटांना उदंड प्रतिसादही दिला. विशेष बाब म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीच्या संघर्षाच्या काळातही मराठी प्रेक्षकांनी नवोदित कलाकारांच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद दिला आहे’ असे सांगत मराठी रंगभूमीवरही प्रेक्षक नवीन नाटकांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे साने यांनी सांगितले.

दर्जेदार संहिता आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद हे कलाकृती यशस्वी होण्याचे मुख्य गणित मराठी रंगभूमी आणि चित्रपटांना मिळालेल्या यशातून अनुभवाला आले आहे. आशयघन चित्रपट ही आपली ताकद आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘मराठी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई केलेल्या ‘सैराट’ चित्रपटातील मुख्य कलाकारांबद्दल सुरुवातीला कोणाला काहीही माहिती नव्हते, मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आणि या कलाकारांना आजही प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. त्यामुळे ‘झापुक झुपूक’ चित्रपटालाही उत्तम प्रतिसाद मिळेल आणि सूरज चव्हाणवरील प्रेक्षकांचे प्रेम अधिक वाढेल’ असा विश्वासही निखिल साने यांनी व्यक्त केला.