“मराठी चित्रपटांच्या दुरवस्थेला मराठी प्रेक्षकच जबाबदार आहेत. इतर प्रादेशिक भाषेत येणारे चित्रपट मात्र सुपरहिट होतात. तेथील स्थानिक कलावंत एका रात्रीत सुपरस्टार होतात. याचे कारण त्या त्या भाषेतील लोक आपल्या भाषेतील चित्रपट आवर्जून पाहतात. मात्र मराठी चित्रपट आपलेच मराठी प्रेक्षक पाहत नाहीत. त्यामुळे कलावंत म्हणून वाईट वाटते.” अशी खंत हास्यजत्रा फेम गौरव मोरेने व्यक्त केली.
शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या अमोल मोहन निरगुडे यांच्या “झटपट करोडपती कसे व्हावे” या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन डोंबिवलीतील सर्वेश हॉल मध्ये झाले.त्यावेळी गौरव मोरे प्रमुख पाहुणा म्हणून आला होता. त्यावेळी त्याने हे वक्तव्य केलं. यावेळी व्यासपीठावर शैलजा जोशी, रेखा गोखले ,दिपाली काळे, सुहासिनी कुलकर्णी , अमोल निरगुडे ,अश्विनी निरगुडे, प्रकाशक डॉ.संतोष राणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
“मराठी अभिनेते जेव्हा हिंदी किंवा इतर प्रादेशिक भाषेत जेव्हा दुय्यम भूमिका करतात तेव्हा आपलेच प्रेक्षक त्यांच्यावर टीका करतात, हे अयोग्य असल्याचे सांगून गौरव मोरे पुढे म्हणाला,” मराठी चित्रपटाला प्रेक्षक मिळत नाहीत ही अतिशय दुःखदायक गोष्ट आहे. मराठी कलावंतांमध्ये अभिनयाची क्षमता जबरदस्त असूनही अनेक वर्ष स्ट्रगल करण्यातच जातात. मराठी प्रेक्षक भाषेचा अभिमान बाळगून जाणीवपूर्वक चित्रपट पाहतील तेव्हाच मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस येतील.”
यावेळी गौरव मोरेच्या हस्ते “झटपट करोडपती कसे व्हावे” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ.नाना भोंग यांच्या “साँच” या आत्मकथनाला “वि. स.खांडेकर” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या वेळी लेखक अमोल निरगुडे ,अमित भावे , दिपाली काळे, प्रकाश चांदे यांचीही भाषणे झाली.