Marathi Bhasha Gaurav Divas : मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने राज ठाकरेंनी मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची उपस्थिती होती. विकी कौशल या गुणी अभिनेत्याने वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची कणा ही कविता सादर केली. ज्या कुणी आजवर कविता सादर केल्या नाहीत त्या कलाकारांनी या मंचावर कविता सादर केल्या. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक सुंदर असा कार्यक्रम राज ठाकरेंनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसेचा खास कार्यक्रम
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरचा छावा हा चित्रपट केल्याने विकी कौशल चर्चेत आहे. विकी कौशलने कविता म्हणायच्या आधी राज ठाकरेंकडून काय निरोप आला आणि त्यांनी काय सांगितलं याबाबत भाष्य केलं. मनसेच्या या कार्यक्रमात आशुतोष गोवारीकर, आशा भोसले, जावेद अख्तर, अशोक सराफ, महेश मांजरेकर, रितेश देशमुख यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती.
विकी कौशल काय म्हणाला?
खरंतर मी आज थोडासा नर्व्हस आहे. मराठीत बोलता येतं कारण दहावी पर्यंत माझं शिक्षण मराठीतच झालं आहे. दहावीत मराठीत जास्त मार्क्स मिळाले, इंग्रजीत कमी मिळाले होते. पण माझं मराठी इतकं छान नाही. त्यामुळे काही भूलचूक झाली तर मला माफ करा. जावेद अख्तर यांनी माझ्या आधी इथे येऊन भाषण केलं. त्यांच्यानंतर मी येऊन बोलतो आहे आणि मला मराठी कविता म्हणायची आहे त्यामुळे मी नर्व्हस आहे. मी महाराष्ट्रयीन नाही तरीही मी मराठीतून शिक्षण घेतलं आहे. आज मराठी भाषा गौरव दिनी शिवाजी पार्क मैदानावर मला या कार्यक्रमात बोलवलं त्यासाठी मी राज ठाकरेंना धन्यवाद देतो. मी या ठिकाणी बसलो होतो आणि इतरांच्या कविता ऐकत होतो. आशाताई बसल्या आहेत त्यांनी मला विचारलं तू कविता वाचणार आहेस? तर मी त्यांना म्हटलं होय. मराठीत? मी म्हटलं हो. त्या म्हणाल्या तौबा तौबा. पण मी प्रयत्न करतो. राज ठाकरे यांनी मला सांगितलं तुला कविता वाचायची आहे तेव्हा मी त्यांना विचारलं कुठली कविता म्हणायची आहे? त्यावर राज ठाकरे म्हणाले कुसुमाग्रजांची कविता कणा. मी त्यांना विचारलं सर मला माफ करा पण कणा म्हणजे काय ते सांगा, त्यांनी उत्तर दिलं Spine. छावा हा चित्रपट करुन मला त्या शब्दाचा अर्थ समजला आहे.
कणा
ओळखलंत का सर मला पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्रा वाचली
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरीही मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा
विकी कौशल जेव्हा जागेवर गेला तेव्हा शिवगर्जना झाली
यानंतर धन्यवाद म्हणून विकी कौशल आपल्या जागेवर गेला. तेव्हा उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणा दिल्या. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण सगळ्यांनीच काम केलं पाहिजे असं मनोगत राज ठाकरेंनीही व्यक्त केलं. विकीने कुसुमाग्रजांची मराठीतून म्हटलेली ही कविता उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरली.