गुढी पाडवा म्हणजे नवचैतन्याचा, मांगल्याचा दिवस. मराठी बांधवांनी त्यांच्या घरावर गुढी उभारून उत्साहात आणि आनंदात नव्या वर्षाचे स्वागत केले. तर राज्यातील विविध शहरांत ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रांचा उत्साह पाहायला मिळाला. या आनंदात सेलिब्रिटीसुद्धा सहभागी झाले असून सोशल मीडियावर जणू शुभेच्छांची गुढीच उभारली आहे असं म्हणायला हरकत नाही. यातच मराठी कलाकार चिन्मय उद्गीरकर, भाग्यश्री लिमये आणि ओमप्रकाश शिंदे यांनीदेखील चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच या नवीन वर्षात त्यांनी केलेल्या संकल्पाविषयीही सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“माणसाच्या संकल्पनावरून आणि ध्येयावरून माणूस कसा आहे ते कळत असतं त्यामुळे या दोन्ही गोष्टींना खूप महत्व आहे. गुढी पाडव्याच्या निमित्ताने नव्याने स्वत:ला पुन्हा घडवायचं आहे. दुसरी गोष्ट आनंदी रहायचे आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण खूप स्ट्रेसमध्ये असतो.त्यामुळे आनंद शोधणं अवघड होऊन बसलं आहे. त्यामुळे आनंदी राहण्याचा प्रयत्न करणार आहे”, असं ‘घाडगे & सून’ मालिकेतील चिन्मय उद्गीरकरने सांगितलं. चिन्मयप्रमाणेच भाग्यश्रीनेही तिच्या संकल्पाविषयी यावेळी सांगितलं.

“चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजे मराठी वर्षाचा शुभारंभ. साडेतीन मुहूर्तापैकी एक विजयाचं प्रतिक म्हणजे गुढी उभारण. आपण गुढी आकाशाच्या दिशेनं उभारतो आपली महत्वाकांक्षा आकाशाएवढी उत्तुंग असावी असा संदेशच जणू ही गुढी देत असते. म्हणूनच यादिवशी नववर्षाचा संकल्प करायचा आणि तो वर्षभर टिकवायचा पण नेमकं हेच तर मला जमत नाही. सुरुवात जोरात होते पण पुढे पुढे कामाच्या व्यग्रतेमुळे सातत्य टिकत नाही, म्हणून यावर्षी ठरवलय असा संकल्प करायचा की तो सहजपणे जमेल. रोज रात्री झोपताना उद्या काय करायचं आहे ते ठरवायचं आणि दुसऱ्या दिवशी रात्री त्याची किती पूर्तता झाली याचा आढावा घ्यायचा. त्यामुळे विचारात, आचारात नेटकेपणा येईल आणि वेळेचं सुयोग्य नियोजनही होईल, पाहुया काय काय होतं ते ! यानिमित्ताने एक गोष्ट आठवते साखरेची जी माळ मिळते ती मला लहान असताना खूप आवडायची… त्यामुळे मी न लाजता कुणाच्याही घरी जायचे आणि विचारून ती साखरेची माळ खात बसायची. खूपच गंमतीदार आहे… पण खरं आहे”, असं भाग्यश्री लिमये म्हणाली.

पुढे ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’मधील ओमप्रकाश शिंदे म्हणतो, “माझा संकल्प आहे पहिल्यापेक्षा उत्तम माणूस होण्याचा प्रयत्न चालू ठेवणार आहे आणि प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्ष्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा! निर्सगाची काळजी घ्या, तो आपली काळजी घेतच असतो. यानिमित्ताने आठवण सांगावीशी वाटते, वडील कडुनिंबाचा पाला गुळात एकत्र करून खायला देतात. ते खाण्याची अजिबात इच्छा नसायची पण डोळे मिटून खायचो आणि पटकन पाणी प्यायचो. हे दरवर्षी घडतं”.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi celebrities wishes gudi padwa