अतुल आणि सोनिया परचुरे, मनोज जोशी आणि महेश मांजरेकर यांच्यात काय साम्य आहे, असे विचारले तर ही सर्व मंडळी ‘सेलिब्रेटी’ आहेत, असे उत्तर पटकन मिळेल. या सर्व ‘सेलिब्रेटीं’ची मुले एका मराठी चित्रपटात नायक/नायिका म्हणून पदार्पण करत आहेत, हे या सर्वामधील आणखी एक महत्त्वाचे साम्य आता ठरणार आहे. आगामी ‘पोरबाजार’ या चित्रपटातून ही सर्व मुले रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत. चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे ‘आभाळमाया’ या मालिकेतील ‘चिंगी’ अर्थात स्वरांगी मराठे ही बालकलाकारही या चित्रपटातून नायिका म्हणून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्वरांगी ही अभिनेते-गायक दिवंगत पं. राम मराठे यांची नात आहे.
अश्विनी दरेकर यांच्या ‘एआरडी एन्टरटेन्मेंट’ने चित्रपटाची निर्मिती केली असून ज्येष्ठ अभिनेत्री आणि कठपुतळी प्रयोगकार मीना नाईक यांची स्ट्रॉबेरी पिक्चर्स ही चित्रपटाची सहनिर्मिती संस्था आहे. ‘व्हिडीओ पॅलेस’ने हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. चित्रपटाचे आणखी एक खास वैशिष्टय़ म्हणजे मीना नाईक यांची मुलगी आणि अभिनेत्री मनवा नाईक ही ‘पोरबाजार’चे दिग्दर्शन करत आहे. स्वतंत्रपणे दिग्दर्शनाचा मनवाचा हा पहिलाच व्यावसायिक प्रयत्न आहे.
चित्रपटात महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या, अभिनेता अतुल परचुरे व नृत्यगुरू सोनिया परचुरे यांची मुलगी सखिल, अभिनेता मनोज जोशी यांचा मुलगा धर्मज तसेच अनुराग हे नवे चेहरे नायक/नायिका म्हणून या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत आहेत. चित्रपटात अंकुश चौधरी आणि सई ताम्हनकर यांच्या जोडीसह चित्रा नवाथे, स्वानंद किरकिरे, प्राजक्ता दिघे, विकास पाटील, शंतनू गव्हाणे, मृणाल पंतवैद्य आदींच्याही भूमिका आहेत. ज्येष्ठ नाटय़ समीक्षक कमलाकर नाडकर्णी चित्रपटात एक विशेष महत्त्वाची भूमिका करीत आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद पराग कुलकर्णी यांचे असून गुरू ठाकूर, श्रीरंग गोडबोले, मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या गीतांना शैलेंद्र बर्वे यांनी संगीतबद्ध केले आहे. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांनी चित्रपटाच्या शीर्षकगीताचे छायाचित्रण केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा