मराठी चित्रपटसृष्टीतील ‘क्युट कपल’ म्हणून ओळखली जाणारी जोडी म्हणजे अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत. ‘टाइम प्लीज’ या चित्रपटामुळ विशेष चर्चेत आलेली ही जोडी प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांमधून झळकलेली ही जोडी आता पहिल्यांदाच एका वेब सीरिजमध्ये एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. ‘आणि काय हवं?…’ अस त्यांच्या पहिल्या सीरिजचं नाव असून नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘आणि काय हवं?…’ या सीरिजच्या माध्यमातून उमेश पहिल्यांदाच वेब विश्वात पदार्पण करत आहे. तर प्रियाची ही दुसरी सीरिज आहे. ‘आणि काय हवं?…’ या सीरिजमध्ये प्रियाने ‘जुई’ची तर उमेशने ‘साकेत’ ही व्यक्तीरेखा साकारली आहे. लग्नानंतर आयुष्यात होणारे काही बदल, पती-पत्नी या नात्यामध्ये असलेलं प्रेम, मैत्रीचं नात यावर ही सीरिज भाष्य करणार असल्याचं एकंदरीतच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून दिसून येत आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून जुई आणि साकेत यांच्या लग्नाला केवळ दोनच वर्ष झाल्याचं दिसून येत आहे. मात्र या दोन वर्षांमध्ये नवरा-बायको हे नातं निर्माण होण्यापूर्वी ते दोघं एकमेकांचे चांगले मित्र झाले आहेत. नात्यातील गोडवा या दोघांनी टिकवून ठेवला आहे, त्यासोबतच कोणताही नवा निर्णय घेताना आपल्या जोडीदाराचं मत विचारात घेणं गरजेचं असतं. यावरही या ट्रेलरमधून प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामुळे प्रेम, मैत्री यांची सांगड घालत या जोडीची भन्नाट केमिस्ट्री या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे.

दरम्यान, प्रिया आणि उमेश त्यांच्या या आगामी प्रोजेक्टसाठी प्रचंड उत्सुक असून त्यांनी यापूर्वीही या सीरिजचे काही पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता प्रियाने ट्विटरवरही या ट्रेलरचीही लिंक शेअर केली आहे. अद्याप या सीरिजविषयी फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र या सीरिजचं लेखन आणि दिग्दर्शन वरुण नार्वेकर यांनी केलं आहे.