गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाला पावसाने झोडपले आहे तर मुंबई करांना खड्यांनी. रस्त्यावरील या खड्ड्यांना आपण शहराच्या गालावर पडलेल्या खळ्या मानले तरी खळ्या दोनच असतात. पण मुंबईमध्ये शेकडो खळ्यांमध्ये चेहरा शोधावा लागत आहे. पावसाळा आणि खड्डे हे तर राज्याचे ठरलेले समीकरण, मुसळधार पावसानंतर तर खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा असा प्रश्न वारंवार विचारला जातो. अनेक वेळा सकाळी घरातून बाहेर पडताना आजचा दिवस ‘गुड डे’ असेल असा विचार करुन आपण बाहेर पडतो. मात्र रस्त्यांवरील खड्यांमुळे हा ‘गुड डे’ कुठे मावळतो हे देखीस कळत नाही. आपण केवळ रस्त्याच्या आणि खड्ड्यांच्या नावाने बोटे मोडत असतो. पण, यावर उपाययोजना करण्यास सरकार अपयशी ठरल्याचे नेहमीच समोर आले आहे.

रस्तावरील लहान मोठे, ओबडधोबड आणि जीवघेण्या खड्यांचा फटका केवळ सामान्यांनाच बसतो असे नाही. तर अनेक कलाकारांना देखील बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील खड्यांना त्रस्त असलेला अभिनेता जितेंद्र जोशी आणि सुबोध भावेने फेसबुक पोस्टद्वारे रस्त्यांची स्थिती सांगत टीका केली होती. आता अभिनेता समिर चौघुलेनेदेखील फेसबुक पोस्टद्वारे रस्त्यांची परिस्थिती किती खराब आहे हे मांडले आहे.

खड्डे बुजविण्यासाठी आणि रस्ते बांधणीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला जातो. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांचा प्रश्न काही सुटलेला नाही. आता प्रसिद्ध कलाकारांनी प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रस्त्यांची स्थिती थोडीफार का होईना सुधारली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Story img Loader