चैताली जोशी
उत्स्फूर्त अभिनयामुळे पुष्कर लोणारकर या बालकलाकाराचं नाव आता ओळखीचं झालंय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चि. व चि.सौ.कां’ या सिनेमात नायिकेच्या लहान भावाची भूमिका साकारून त्याने सिनेमात धमाल उडवलेली आहे.
‘फुकनीच्या म्हणजे शिवी आहे का.. ती फुकनी नसते का चुलीची.. नरसाळ्या!’ हा संवाद आठवतोय? कसा विसरता येईल म्हणा. निखळ मनोरंजन करणाऱ्या ‘एलिझाबेथ एकादशी’ या सिनेमामधल्या गण्याचा हा लोकप्रिय झालेला संवाद. हा गण्या या सिनेमानंतर अनेक सिनेमांमध्ये दिसला. नुकताच तो ‘चि. व चि.सौ.कां.’ यामध्येही दिसला. पण या वेळी तो दिसला टिल्ल्या म्हणून. हा टिल्ल्या म्हणजे पुष्कर लोणारकर. उत्स्फूर्त अभिनय, संवादफेक, हावभाव या साऱ्यामुळे पुष्करच्या कामाचं प्रेक्षकांकडून कौतुक होतंय. ‘एलिझाबेथ..’नंतर ‘बाजी’, ‘रंगा पतंगा’, ‘रांझण’ या सिनेमांमध्येही पुष्कर दिसला. लहान वयातच अभिनयाची समज असलेला पुष्कर ‘चि. व चि..’ मध्ये धमाल करतो आणि प्रेक्षकांना खळखळून हसवतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लग्नसंस्थेवर भाष्य करणारे सिनेमे याआधीही येऊन गेले आहेत. त्यातून वेळोवेळी महत्त्वाचे संदेशही आपण ऐकले, बघितले आहेत. पण, एक वेगळा विचार ‘चि. व चि. सौ. कां’मध्ये दिसून आला. विषय, संवाद, कलाकारांचा अभिनय या साऱ्यामुळे तर सिनेमा लक्षात राहतोच. पण पुष्करमुळेसुद्धा तो आकर्षक वाटतो. पुष्कर याआधी अनेक सिनेमांमधून दिसला आहे. पण, ‘चि. व..’मधलं त्याचं काम एकदम भन्नाट झालं आहे. सिनेमा सुरुवातीपासून शेवटपर्यंत हसवतोच; त्यात भर पडते ती पुष्करच्या अभिनयाची. घरातलं शेंडेफळ त्याने उत्तम रंगवलंय. पुष्करची अभिनयाची सुरुवात झाली ‘एलिझाबेथ एकादशी’ या सिनेमापासून. दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांना या सिनेमासाठी पंढरपूरमध्ये वाढलेली, वारीचा अनुभव घेतलेली लहान मुलं हवी होती. पुष्कर मुळचा पंढरपूरचाच. त्या सिनेमासाठी निवड झालेल्या मुलांपैकी पुष्कर एक. या निवडक मुलांची त्या सिनेमासाठी कार्यशाळा झाली आणि पुष्कर ‘एलिझाबेथ.’मध्ये झळकला. त्या सिनेमातलं काम बघून त्याला आणखी काही सिनेमे मिळाले. त्यातही त्याने बाजी मारली.

‘चि. व चि.सौ.कां.’ या सिनेमात काम करण्याचा अनुभव तो सांगतो, ‘मधुगंधा मॅडमनी माझे फोटो मागितले होते. काही दिवसांनी मी त्यांना फोन करून त्याबाबत विचारलं. तेव्हा मला कळलं की त्यांच्याच एका सिनेमासाठी त्यांनी मला फोटो पाठवायला सांगितले आहेत. मग पुन्हा एकदा कार्यशाळा झाली आणि भूमिका समजली. मी माझी भूमिका पडद्यावर रंगवली. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय; याचा खूप आनंद आहे.’ पुष्करची ‘एलिझाबेथ..’मध्ये जशी संवादफेक होती तशीच ‘..चि. सौ.कां.’मध्येही आहे. त्याचे संवाद अतिशय साधे आहेत पण ते बोलण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे प्रेक्षक तिथे खळखळून हसतो. ‘त्यांचं जोडायचंय की तुमचं तोडायचंय’, ‘त्यांना ते चित्र आवडलं नाही म्हणजे त्यांच्यातले हार्मोन्स संपत चाललेत का,’ असे संवाद प्रेक्षकांची दाद मिळवतात. ‘ए आई मला पैठणी हवी हं हिच्या लग्नात. नाहीतरी आपल्या घरातलं हे शेवटचंच कार्य आहे,’ असं सावित्री म्हणजे सिनेमाच्या मुख्य नायिकेची मोठी बहीण म्हणते त्यावर टिल्ल्या ‘का? माझं लग्न?’ असं पटकन इतक्या आत्मविश्वासाने म्हणतो की त्यानंतरचा संपूर्ण प्रसंग प्रेक्षकांना हसवतो. त्याचे वडील त्याला म्हणतात, ‘आम्ही एका छोटय़ा समारंभाला जातोय.’ तर त्यावर तो वडिलांना सांगतो, ‘आमच्या शाळेतही एक छोटा समारंभ आहे. मी, तुम्ही आणि शाळेचे मुख्याध्यापक असा’ हे वाक्य ज्या पद्धतीने तो म्हणतो त्यावर सिनेमागृहात हशा फुटलाच म्हणून समजा. ही सगळी कमाल संवादलेखकाची आहेच. पण त्याचबरोबर ते सादर करणाऱ्या कलाकाराचीही आहे. म्हणूनच पुष्कर लोणारकरची दखल घ्यावीच लागेल.

प्रेक्षकांना टिल्ल्या ही व्यक्तिरेखा आवडली याचं एक कारण तो सांगतो, ‘टिल्ल्या अतिशय खोडकर आहे. मला वाटतं प्रेक्षकांना ती व्यक्तिरेखा आवडली, कारण प्रत्येकात त्या वयामध्ये एक खोडकर वृत्ती असतेच. त्या वृत्तीशी प्रेक्षकांनी जोडून घेतलं आणि म्हणून त्यांना ती व्यक्तिरेखा आवडली असं मला वाटतं.’ सिनेमात त्याला दुकानातून काही तरी आणायला सांगतात. तेव्हा त्याचं पोट दुखतंय असं तो सांगतो. थोडय़ा वेळाने आणखी काही काम सांगतात. तेव्हा त्याचे पाय दुखण्याचं कारण तो पुढे करतो. हा खोडकरपणा पुष्करने अतिशय चोख रेखाटला आहे. घरी आलेल्या पाहुण्यांसमोर बिनधास्त बोलण्याचा प्रसंगही तितकाच भन्नाट! आत्तापर्यंत पुष्करने साकारलेल्या भूमिकांमध्ये ग्रामीण भाषेची ढब होती. पण ‘चि. सौ. कां.’मध्ये पुणेरी ढब आहे. त्याला स्वत:ला ते करताना खूप मजा आल्याचं तो आवर्जून सांगतो.

अडीच वर्षांमध्ये पाच सिनेमांमध्ये दिसलेला पुष्कर या यशाला अजिबात हुरळून गेलेला नाही. तो सध्या नववीत आहे. करिअर कशामध्ये करायचं, याचं नेमकं उत्तर त्याला आता तरी देता येत नाही. पण शिक्षण पूर्ण करुन एक पर्याय सोबतीला ठेवणं हे मात्र त्याला ठाऊक आहे. ‘आता सिनेमांमध्ये काम करतोय. त्याचं कौतुकही होतंय म्हणून आता यातच करिअर करायचंय असं मी अजून तरी ठरवलं नाही. तिथे कधी काम मिळेल तर कधी नाही, याची मला माहिती आहे. त्यामुळेच शिक्षण पूर्ण करून मी स्वत:साठी एक पर्याय निश्चितच ठेवणार आहे. दहावीनंतर मी काय करेन हेही मला आता सांगता येणार नाही. पण कदाचित विज्ञान शाखेकडे झुकेन असं वाटतं. गेली चार र्वष मी शास्त्रीय संगीत शिकतोय. त्यामुळे कदाचित त्यातही करिअर करण्याचा माझा विचार पक्का होईल. मला आता नेमकं सांगता येणार नाही. पण मी अनेक पर्यायांचा विचार करेन,’ पुष्कर करिअरबद्दलचं त्याचं मत व्यक्त करतो.

वाचा : अलका कुबल- आठल्येंच्या मुलीची गगन भरारी 

साधारणपणे बालकलाकारांचं कौतुक झालं की त्यांचे कुटुंबीयच जास्त उत्सुक असतात. त्याला मिळणाऱ्या नवनवीन कामांमध्ये त्यांनाच जास्त रस असतो. पण पुष्करच्या बाबतीत तसं झालं नाही. खरं तर फार कमी कालावधीत पुष्कर लोकप्रिय झाला आहे. पण, त्याच्या आई-बाबांचा ‘आता तू सिनेमांमध्येच काम कर’ असा आग्रह अजिबात नाही. त्यांचंही प्राधान्य शिक्षणालाच आहे. त्यानंतर त्याला हवं ते करण्याचं स्वातंत्र्य त्यांनी त्याला दिल्याचं तो सांगतो. पुष्करला कविता करण्याचाही छंद आहे. त्याला वाचनही आवडतं. आगामी ‘टीटीएमएम’ आणि ‘खिडकी’ या दोन सिनेमांमध्येही तो दिसणार आहे. त्याच्या प्रत्येक सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा पुष्कर पुढील सिनेमांमधूनही तितकीच धम्माल करेल आणि प्रेक्षकांचं करमणूक करेल, असं दिसतंय. मराठी सिनेमांमध्ये सध्या असलेली बालकलाकारांची फळी अधिकाधिक बळकट होतेय हे पुष्करच्या उदाहरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झालं.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
@chaijoshi11
सौजन्य – लोकप्रभा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi child artist pushkar lonarkar chi va chi sau ka movie lokprabha article
First published on: 07-06-2017 at 13:41 IST