अलीकडच्या काळात एकेका दिवशी चार-चार मराठी सिनेमे प्रदर्शित झाले. त्याशिवाय दर आठवडय़ाला वेगवेगळे सिनेमे येतच आहेत. या सगळ्या सिनेमांचं पुढे नेमकं काय होतं? म्हणजे ते सगळे लोकांना आवडतात का? तिकीटबारीवर ते यशस्वी होतात का? आशयदृष्टय़ा ते कसे असतात?
‘श्वास’नंतर म्हणजेच २००३ नंतर मराठी सिनेमात बदलाचे वारे वाहू लागले हे वाक्य आता परत वापरू नये इतके गुळगुळीत झाले आहे. त्या बदलाच्या वाऱ्याने गेल्या बारा वर्षांत प्रचंड बदल केले. चित्रपटांची संख्या तर वाढलीच, पण नवे प्रवाह रुजले, खर्चात आणि उत्पन्नात वाढ होत गेली. पण आजही एक इंडस्ट्री म्हणून आपण किती आणि कसे स्थिरावलो आहोत, याचं उत्तर प्रत्येक टप्प्यावर शोधणं महत्त्वाचं ठरते. मागील वर्षांत शंभराच्या आसपास चित्रपट प्रदर्शित होत असताना वर्षांखेरीस आपल्या हाती काय शिल्लक राहते, तर शंभरपैकी फार फार तर १५ चित्रपटांचा ठसा उमटतो, त्यापैकी पाच चांगला व्यवसाय करतात, पाच बऱ्यापैकी तरून जातात आणि केवळ पाचच नवीन प्रयोग होतात.
आशयघनता हा मराठी चित्रपटांचा सर्वात महत्त्वाचा पैलू राहिला आहे. किंबहुना आजही इतर भाषिक चित्रपटसृष्टी अगदी हिंदीदेखील या आशयघनतेमुळेच आपल्याला ओळखते. मागील वर्षांतील कोर्ट, ख्वाडा, किल्ला, अस्तु या चित्रपटांवर राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर यांचा उल्लेख त्यादृष्टीने करता येईल. पण त्यापलीकडे व्यावसायिक विचारदेखील अपेक्षित आहेत. मराठी चित्रपटांची आशयघनता, आशयघनता आणि त्याचबरोबर लोकप्रियता, काहीशी वेगळी वाट निवडत लोकप्रियता आणि निव्वळ व्यावसायिक लोकप्रियता अशी साधारण विभागणी करता येईल. अर्थातच त्यामध्ये यशस्वी आणि अयशस्वी असे सरळसरळ दोन गट पडतील. या चष्म्यातून वर्षभरातील चित्रपटांकडे पाहिल्यास नेमके आज आपण कोठे उभे आहोत याचा अंदाज येऊ शकेल.
एक उद्योग म्हणून यांची विभागणी ही यशापयशावरच करावी लागेल. गेल्या वर्षभरात आशयघन असणारे कोर्ट, किल्ला, बायोस्कोप, ख्वाडा, हायवे हे चारही चित्रपट (ख्वाडाचा अपवाद सोडल्यास) लोकप्रिय होऊ शकले नाहीत म्हणजे त्यांना म्हणावे तितके व्यावसायिक यश लाभले नाही. सोयीनुसार आशयघनता जोपासत थेट व्यावसायिक यशावर नजर ठेवणारे आणि लोकप्रियता लाभलेल्यांमध्ये ‘डबलसीट’, ‘टाइमपास टू’, ‘क्लासमेट’, ‘मुंबई-पुणे-मुंबई टू’, ‘कटय़ार काळजात घुसली’ यांचा उल्लेख करावा लागेल. तर काहीसा वेगळा विचार मांडत पण आशयाला जागणाऱ्यांमध्ये ‘कॉफी आणि बरेच काही’, ‘राजवाडे अॅण्ड सन्स’, ‘दगडी चाळ’, ‘लोकमान्य एक युगपुरुष’, ‘मितवा’ यांना मर्यादित यश मिळाले. तर ‘शटर’, ‘परतु’, ‘सिद्धांत’, ‘नागरिक’, ‘संदूक’, ‘नीळकंठ मास्तर’ यांना अगदीच माफक यश मिळू शकले. ‘अगं बाई, अरेच्या टू’, ‘बाजी’, ‘ए पेइंग घोस्ट’ आणि ‘तू ही रे’ या चर्चेत असणाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला.
२०१५ तील मराठी चित्रपटसृष्टीचा आढावा घ्यायचा तर तो असा एका परिच्छेदातच संपून जातो. उर्वरितांनी केवळ जागा भरण्याचे काम केले असे म्हटले तरी हरकत नाही. पण हे सारे आणखीन एका वेगळ्या चष्म्यातून पाहावे लागेल. विश्लेषण करावे लागेल. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो या सर्वाचे मार्केटिंग. जो वाजणार तोच गाजणार असंच चित्र आहे. त्यामध्ये नेमके आपण कसे आणि कोठे आहोत हे तपासताना काही गोष्टी अगदी ठामपणे पुढे येतात. ‘किल्ला’, ‘कोर्ट’ आणि ‘हायवे’ या तीन चित्रपटांचे उदाहरण घेता येईल. थेट सवरेत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट असल्यामुळे ‘कोर्ट’ अनेकांना माहीत झाला होता. पण तो काही लोकांच्या पचनी पडला नाही. तर ‘किल्ला’ एस्सेल व्हिजन (आत्ताचा झी स्टुडिओ)मुळे सर्वांपर्यंत पोहचू शकला आणि ‘हायवे’ केवळ एका ठरावीक वर्गातच चर्चिला गेला. ‘ख्वाडा’च्या निर्मितीच्या मागच्या मेहनतीबद्दल बरीच चर्चा झालेली असल्यामुळे तो लोकांमध्ये चर्चिला गेला. ‘डबलसीट’, ‘टाइमपास टू’, ‘क्लासमेट’, ‘मुंबई-पुणे-मुंबई टू’, ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटांच्या आशयाला मार्केटिंगचा आधार मिळाल्यामुळे यशाचं शिखर दिसू शकलं. त्यापैकी ‘टाइमपास टू’ आणि ‘क्लासमेट’ मार्केटिंगवरच तरले. तर ‘कॉफी आणि बरेच काही’, ‘राजवाडे अॅण्ड सन्स’, ‘दगडी चाळ’, ‘लोकमान्य एक युगपुरुष’, ‘मितवा’मध्ये मार्केटिंगबरोबरच कलाकारांच्या नावाचा आणि वेगळ्या कथानकाचा मध्यम फायदा मिळाला. इतरांना फारसा फायदा घेता आला नाही.
येथे व्यावसायिक यशाचा अर्थ थोडासा स्पष्ट करावा लागेल. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर एकदोन आठवडय़ानंतर बॉक्स ऑफिसचे आकडे जाहीर होऊ लागतात. बॉक्स ऑफिस कलेक्शन कितीही आकर्षक वाटत असले तरी त्यातून जास्तीत जास्त चाळीस टक्केच रक्कम निर्मात्यांच्या हाती लागते. त्यातून चित्रपट निर्मितीचा खर्च वजा केला तर उरलेली रक्कम नफा म्हणून विचारात घ्यावी लागते. म्हणजेच आजवर जे काही आकडे प्रसिद्ध झाले ते पाहता अगदी हाताच्या बोटावर मोजणाऱ्यांनाच नफ्याचे हे गणित व्यवस्थितपणे मांडता आले. त्यातही मराठी चित्रपटांचे बॉक्स ऑफीस कलेक्शनचे आकडे जाहीर करणारी कोणतीही अधिकृत व्यवस्था आपल्याकडे नाही. निर्माते जे सांगतील तेच खरे म्हणावे लागते. अशा वेळी नेमके आकडे कोणते हा प्रश्न उरतोच.
पण केवळ मार्केटिंगच तुम्हाला तारून नेते असेदेखील नाही हे ‘अगं बाई अरेच्या टू’, ‘बाजी’, ‘ए पेइंग घोस्ट’ आणि ‘तू ही रे’ या चर्चेत असणाऱ्या चित्रपटांच्या अपयशाने दाखवून दिले आहे. म्हणजेच लोकप्रियता मिळवणारा बरा कंटेट असेल तर त्याला मार्केटिंग फायदेशीर ठरते.
त्याच वेळी जवळपास ८०-८५ टक्क्य़ांचा एक मोठा गट शिल्लक राहतोच याकडेदेखील लक्ष द्यावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे या सर्वाना निधीचा पुरवठा बऱ्यापैकी होत असतो, काही ठिकाणी चांगले कलाकार देखील लाभतात, पण त्यांच्या एकंदरीत निर्मितीत एक व्यावसायिक कलाकृती म्हणून वेगळी मेहनत दिसत नाही. हा वर्ग गेली चार-पाच वर्षे चांगलाच फोफावला आहे. अनेक जुने ठरावीक सिनेमाकर्ते तर आहेतच, पण नवेदेखील येत आहेत. एक व्यवसाय म्हणून हे सगळं ठीक असले तरी त्यातून नेमकं साधलं काय जातं हा वेगळाच अभ्यासाचा विषय म्हणावा लागेल. यातील अनेक चित्रपट अगदी तद्दन भंपक असतात. ना चांगला मसालापट असतो, ना करमणूक. अशी ही सूज गेले चार-पाच वर्षांत एका ठरावीक गतीने टिकून आहे.
तर दुसरीकडे नव्याने येणाऱ्याचा आशयघनता अथवा लोकप्रिय या दोन्ही वर्गवारीत अगदीच मोजका समावेश आहे. ते वजा करता प्रस्थापित अथवा प्रथितयशांचा भरणाच अधिक आहे. पण त्यापैकी रवी जाधव, सतीश राजवाडे, केदार शिंदे, संजय जाधव यांनी नवीन काहीच दिलं नाही. (‘बायोस्कोप’ हा नवीन प्रयोग होता आणि तो पूर्ण करून वर्ष-दीड वर्षे झाली होती.) नव्याने काही प्रयोग करणाऱ्यांमध्ये नवीन दिग्दर्शक अथवा निर्माता ‘कोर्ट’, ‘किल्ला’ आणि ‘ख्वाडा’ या चित्रपटांचा अपवाद सोडला तर अगदीच अभावाने दिसून येतात. ‘हायवे’ एकदमच वेगळ्या पठडीत तयार झाला होता. बाकीच्यांनी काहीतरी नवा प्रयत्न करत चार पैसे मिळवले. आशय आणि लोकप्रियतेची सांगड घालणाऱ्यांमध्ये नव्या चेहऱ्यांची (‘कॉफी आणि बरंच काही’ वगळता) भरदेखील तुलनेने कमीच म्हणावी लागेल.
चित्रपटांची वाढती संख्या आणि त्यानुसार बाजारपेठ काबीज करण्याच्या प्रक्रियेनुसार मागील वर्षांकडे पाहिले असता आता आपल्याकडे स्पष्टपणे काही गट तयार झाले आहेत. त्यांनी स्वत:चे साचे ठरवून घेतले आहेत. त्यानुसारच ते जातात. त्यापलीकडचा कोणी आलाच तर त्याला फारसा वाव मिळत नाही. त्याला एकांडी शिलेदारी करावी लागते. कलेवर आधारित असा एक बदलता व्यवसाय म्हणून आपण स्थिरावलो नाहीत हेच यातून जाणवते. ‘अस्तु’सारखा चित्रपट तयार होऊन प्रदर्शित होऊ शकत नाही, तर संजय सूरकरांचे शेवटचे दिग्दर्शन असलेल्या ‘लाठी’ला पडद्यावर येण्यासाठी प्रचंड आटापिटा करावा लागतो. अनेक चित्रपटांना प्रस्थापितांचा परिसस्पर्श होण्यासाठी प्रदीर्घ वाट पाहावी लागते. आपण ज्या आशयासाठी ओळखले जातो त्याचा विचार करता ही धोक्याची घंटाच आहे म्हणावे लागेल.
एकंदरीतच विचार करता व्यावसायिक यश हे प्रयोगांपेक्षाही लोकप्रियतेलाच अधिक मळत असल्याचे दिसते, त्यातदेखील एका ठरावीक गटाचेच ते असते असे आढळून येते. व्यावसायिक चित्रपटांच्या तुलनेत मराठीत आशयघनतेला बरीच धडपड करावी लागतेय, असे चित्र आहे. येत्या वर्षांत आपण लोकप्रियतेकडेच अधिक झुकू लागलेलो आहोत, असे दिसत आहे. अगदी दाक्षिणात्य स्टाइलचा आधारदेखील घेत आहोत. तरीदेखील काही नवीन प्रयोग पाहायला मिळतील अशी अपेक्षा धरता येईल. पण हा साचलेपणा दूर करण्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करणाऱ्या अनेक नव्यांची गरज निर्माण झाल्याचे हे द्योतक आहे. अन्यथा टिपिकल साच्यात चित्रपटांची प्रमोशन होत राहतील आणि आशयाची जागा लोकप्रियता व्यापू लागेल.
वाढती संख्या आणि व्यावसायिकतेचा अभाव
चित्रपट निर्मिती आणि प्रदर्शित चित्रपट यांतील फरक गेल्या वर्षांत कमी झाला आहे. पण त्याचबरोबर एखाद्या बिग बजेट चित्रपटाच्या दिवशीच अन्य कोणीही न येण्याचे प्रमाणदेखील तसेच वाढताना दिसते. त्यामुळेच एकाच आठवडय़ात चार चार चित्रपटदेखील आले. या वर्षी तर पाच चित्रपट प्रदर्शित झाले आणि पुढच्याच आठवडय़ात केवळ एकच चित्रपट आला. प्रदर्शित करण्यासाठी नियमांचे बंधन हवे अशी मागणी करणारा एक मोठा गट असला तरी व्यावसायिक दृष्टिकोनातून अशा बंधनाला महत्त्व नाही. पण मराठी प्रेक्षकांची संख्या आणि चित्रपट पाहण्याची आवड या साऱ्याचा विचार केला तर एकाच आठवडय़ात लोकांनी किती आणि कसे पाहायचे याचे तारतम्य निर्मात्यांना नसल्याचेच दिसून येते. व्यावसायिकतेचा अभाव हाच यामागे मोठा घटक म्हणावा लागेल.
गटातटांचे सावट धोकादायक
चित्रपट हा व्यवसाय आहे. तो व्यावसायिक पद्धतीनेच व्हावा ही साधी अपेक्षा. पण गेल्या वर्षांत इथे गटातटाचं सावट दिसून आलं. कलेकडे कला आणि त्या कलेचं व्यावसायिक उत्पादन म्हणून न पाहता त्यातील आशयाला समूहाचे लेबल लावायचे आणि त्यातून मग फुकाच्या चर्चेचे फड रंगवायचे ही पद्धत रुजू पाहत आहे. त्यातून मग गटबाजी करायची या राजकीय गणितांनी येथे शिरकाव केला आहे. तुम्ही आमच्या चित्रपटाचे कौतुक करत नाही, मग आम्ही तुमच्या का करायचं, किंवा हा तुमचा चित्रपट म्हणून तुम्ही खूप स्तुती करताय असा आरोप करायचा हे सारं मागच्या वर्षी घडलं. वेगाने विकसित होत चाललेल्या मराठी चित्रपटसृष्टीवर हे सावट गडद होत गेलं तर मात्र भविष्यात कला बाजूला राहील आणि प्रत्येक गटाने आपापला चित्रपट चालवायचा असंच होऊन बसेल.
सुहास जोशी –