मराठी चित्रपटांत कथा हाच चित्रपटाचा आत्मा असतो. आपल्या चित्रपटांत कलाकारापेक्षाही कथा मोठी असते. याच कथेच्या जोरावर मराठी चित्रपट लवकरच विश्वव्यापी बनेल, असा विश्वास चित्रपट व त्यासंबंधी क्षेत्रातील विविध मान्यवरांनी व्यक्त केला.
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या परिसंवादात हे मान्यवर बोलत होते. ‘मराठी चित्रपटाची शतकमहोत्सवी वाटचाल आणि पुढील शतकातील आव्हाने’ या विषयावरील परिसंवाद प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीतील मिनी थिएटरमध्ये झाला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे होते. तर दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, निर्माते अभिजित घोलप, चित्रपट अभ्यासक व समीक्षक सुधीर नांदगावकर, दिग्दर्शक विजय कोंडके, चित्रपट पत्रकार व लेखक दिलीप ठाकूर आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी या परिसंवादात सहभाग घेतला. ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.
पुढील २५ वर्षांत मराठी चित्रपट सर्वव्यापी बनेल, असा विश्वास गजेंद्र अहिरे यांनी व्यक्त केला. या विश्वासाला सर्वच वक्त्यांनी होकार दर्शवला. दरवर्षी शंभराच्या संख्येने प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचे प्रमाण रोखण्यासाठी अनुदानाचे गाजर दाखवणे बंद करायला हवे, असे मत सुधीर नांदगांवकर यांनी व्यक्त केले. पण अनुदान म्हणजे गाजर नसून ते चित्रपटसृष्टीत प्राण फुंकणारे औषध आहे, असा युक्तिवाद अहिरे यांनी केला. मराठी चित्रपट मार्केटिंगमध्ये खूप मागे पडतात. मराठी चित्रपटाला विश्वव्यापी बनवण्यासाठी प्रत्येक चित्रपटाने आपल्या मार्केटिंगकडे खूप काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज निर्माता अभिजित घोलप यांनी बोलून दाखवली. तसेच या चित्रपटसृष्टीत बाहेरच्या निर्मात्यांनी प्रवेश करणे, हे खूप चांगले लक्षण आहे, असे मतही या सर्वानी व्यक्त केले. मात्र या निर्मात्यांना चांगले दिग्दर्शक मिळण्याची गरज असल्याचेही सर्वानी नमूद केले. तरुणांना आपलासा वाटेल, असा मराठी चित्रपट बनवण्याची गरज आहे. सध्याचे मराठी चित्रपट हे ४०च्या पुढील वयोगटातील लोकांसाठी आहेत, असे मत दिलीप ठाकूर यांनी व्यक्त केले. तर विषयांना तंत्रज्ञानाची जोड देऊन सर्वच चित्रपटकर्ते आपले चित्रपट तरुणाईच्या जवळ पोहोचवण्याचा प्रयत्न करतील, अशी खात्री गजेंद्र अहिरे यांनी दिली.

Story img Loader