सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित असलेला ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाचा जलवा अजूनही कायम आहे. या सिनेमानं ‘वेड’ या सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. त्यामुळे सध्या ‘बाईपण भारी देवा’ची घोडदौड १०० कोटींच्या दिशेने सुरू आहे. मराठी सिनेसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा सिनेमा ठरला आहे. असा हा ब्लॉकबस्टर ठरलेला सिनेमा नुकताच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाहिला. त्यानंतर आता दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी ‘बाईपण भारी देवा’ सिनेमा पाहिला आहे. यासंबंधिताचा व्हिडीओ दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा – बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला अभिनेता शायनी अहुजाला उच्च न्यायालयाकडून दिलासा; ‘या’साठी मिळाली परवानगी
केदार शिंदे यांनी सिनेमागृहातील पोलीस अधिकाऱ्यांचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, “१०० डायल केलं तर मदतीसाठी पोलीस हजर होतात. काल १०० पोलीस ‘बाईपण भारी देवा’ सिनेमा पाहण्यासाठी हजर होते. दिवसरात्र सणवार आपल्या सेवेत असलेले काल २ तास आनंदात होते. सिनेमा संपल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान खूप काही देऊन गेलं. पुरुषांनी हा सिनेमा पाहायला हवा.. हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. शुक्रवारपासून सिनेमागृहात ‘बाईपण भारी देवा’ १०० रुपयाच्या तिकीटावर पाहायला मिळणार आहे. आता पुरुषांची गर्दी नक्कीच होईल, आपल्या आवडत्या स्त्रीबरोबर सिनेमा पाहायला”
हेही वाचा – “बॉडीमुळे नाही, तर….”, अभिषेक बच्चनने नवोदित अभिनेत्यांना दिला सल्ला; म्हणाला…
या व्हिडीओत पोलीस अधिकारी सिनेमा पाहून झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एक पोलीस अधिकारी म्हणाले की, “‘माहेरची साडी’ सिनेमानंतर असा महाराष्ट्रामध्ये हा क्षण दुसऱ्यांदाच येतोय. पुरुष एवढ्या मोठ्या संख्येनं सिनेमाला जात नव्हते. तुम्ही या महाराष्ट्राला आणि समाजाला उत्कृष्ट सिनेमा दिला आहे. हा सिनेमा आम्ही पोलिसांना मुद्दाम दाखवला. तोही विशेषतः पुरुष पोलीस अधिकाऱ्यांना दाखवला.”
हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री झळकणार ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत; दिसणार ‘या’ भूमिकेत
दरम्यान, मराठीत सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड आजही सैराट सिनेमाच्या नावावर आहे. त्यामुळे आता येत्या काळात हा रेकॉर्ड ‘बाईपण भारी देवा’ सिनेमा मोडणार की नाही हे स्पष्ट होईल.