शाळेतील लहान मुलांच्या भावविश्वावर आधारित एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव थोडं हटके आहे. या चित्रपटाचे लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. तसेच चित्रपटाचं शूटिंग पुणे जिल्ह्यातील एका गावात करण्यात आलं आहे.

‘८७ रुपयांचा शाईचा पेन’ असे अनोखे नाव या चित्रपटाचे आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक या ग्रामीण भागात पूर्ण करण्यात आले. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे रवी परशुराम निंबाळकर यांनी केले असून या चित्रपटाची कथा शाळेतील लहान मुलांच्या भावविश्वावर आधारलेली आहे. या चित्रपटामध्ये एका लहान मुलाने ८७ रुपयांचा शाईचा पेन घेण्यासाठी केलेली धडपड, त्यात येणाऱ्या अडचणी आणि गमती-जमती दिग्दर्शकाने दाखवल्या आहेत.

या चित्रपटाचे काम फेब्रुवारी महिन्यात पूर्ण झाले असून या आगामी चित्रपटाचे पोस्टरचे अनावरण २० फेब्रुवारी २०२५ रोजी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराजराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले.

या चित्रपटात मुख्य बालकलाकार है साईराज सरडे, शुभम सावंत असून तसेच पटकथा सर्वाद लेखन संकेत आवळे व ऋषिकेश मराठे, छायाचित्रण हरीश सुकुमारन, संकलक ऋषिकेश चव्हाण, रंगभूषा केशभूषा चेतन शिंदे, वेशभूषा योगिता पवार आणि साउंड डिझाईन तथा कार्यकारी निर्माते महेश नाईक आहेत.

चित्रपट निर्माते श्री. एम के धुमाळ आणि श्री विजय चौधरी यांच्या श्री गणेश मुव्ही क्रिएशन्स या चित्रपट निर्मिती संस्थेअंतर्गत चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन हे पुण्यातील एम के स्टुडिओमध्ये पूर्ण झाले आहे.

‘८७ रुपयांचा शाईचा पेन’ हा चित्रपट यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट लवकरच जाहीर केली जाईल.

Story img Loader