भालचंद्र नेमाडे यांच्या प्रसिद्ध ‘कोसला’ कादंबरीवर आधारित लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज या चित्रपटाची घोषणा झाली असून ‘कोसला-शंभरातील नव्याण्णवांस…’ असं चित्रपटाचं नाव आहे. आदित्य राठी आणि गायत्री पाटील या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. तसेच लोकप्रिय हरहुन्नरी अभिनेते सयाजी शिंदे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भालचंद्र नेमाडे लिखित ‘कोसला’ या बहुचर्चित कादंबरीने साहित्य विश्वात एक वेगळे युग निर्माण केले. लेखनाची साचेबंद चौकट मोडून आपली रोखठोक मते यात लेखकांनी मांडली होती. त्यामुळेच ही कादंबरी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. पांडुरंग सांगवीकर नामक तरुणाची ही कथा. गावातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणाला कसे अनुभव येतात, त्यानंतर पुन्हा गावात गेल्यावर त्याला तिथे आलेले अनुभव यांचा प्रवास म्हणजे कोसला. या तरुणाचा जीवनप्रवास सांगणारी ही कादंबरी आता चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर झळकणार आहे. नुकतीच ‘कोसला-शंभरातील नव्याण्णवांस…’ या चित्रपटाची एका भव्य सोहळ्यात घोषणा करण्यात आली. या सोहळ्याला कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडेही उपस्थित होते. यावेळी गायक जयदीप वैद्य आणि तबला वादक केतन पवार यांच्या निर्गुण शास्त्रीय संगीताने या सोहळ्यात रंगत आणली. तर अच्युत पालव यांनी कॅनव्हासवर ‘कोसला’ची सुंदर कलाकृती साकारली. आदित्य राठी आणि गायत्री पाटील दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे यांची प्रमुख भूमिका असून निर्माण स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचे मेहुल शाह निर्माते आहेत.

हेही वाचा – Video: “मी जेव्हा पहिल्यांदा डीपफेक व्हिडीओ पाहिला… “, रश्मिका मंदानाची प्रतिक्रिया; म्हणाली, “जगभरातील सर्व मुलींना…”

१९६३ मध्ये वयाच्या २५व्या वर्षी भालचंद्र नेमाडे यांनी ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी इंग्रजीसह हिंदी, गुजराती, कन्नड, असामी, पंजाबी, उर्दू, बंगाली आणि ओरिया भाषेत अनुवादित करण्यात आली. त्यामुळे या कादंबरीची ओळख केवळ भारतापुरताच मर्यादित राहिली नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. २०१४ मध्ये डॉ. भालचंद्र नेमाडे यांना भारतीय साहित्यातील सर्वोच्च समजला जाणारा ५०वा ज्ञानपीठ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

चित्रपटाबद्दल साहित्यिक भालचंद्र नेमाडे म्हणाले, “साहित्य इतकेच माझे चित्रपटांवरही प्रेम आहे. मला चित्रपटांमध्ये पाहण्याव्यतिरिक्त काही करता आले नाही. मात्र सयाजी शिंदे या मित्रामुळे माझा पाय चित्रपटांपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत ‘कोसला’साठी अनेक जण मला भेटले परंतु त्यांना ते जमले नाही. मला यांच्याबाबतीतही तसेच वाटले. वर्षभरात म्हणतील काही जमत नाही आणि सोडून देतील. परंतु यांची चिकाटी अफाट होती. ते इथपर्यंत पोहोचले. त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत आणि त्यामुळे मला उभारी मिळाली. पुढच्या कांदबऱ्या लिहिण्याचा उत्साह यांनी मला दिला आहे.”

हेही वाचा – ‘गोमू संगतीनं माझ्या तू येईशील का?’ गाण्यावर गणेश आचार्य यांनी केली रील; पण एका चुकीमुळे नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले…

तर अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, “जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हाच ही कांदबरी आली होती. तेव्हा मी स्वतः या कादंबरीतील उतारे पाठ केले होते. बोलण्यासाठी आणि अभिनयासाठी त्याचा कसा वापर होईल, याचा विचार करायचो. त्यानंतर बराच काळ लोटला. अनेकांचा या कादंबरीवर चित्रपट करण्याचा विचार होता. याच दरम्यान मला मेहुल सरांचा फोन आला. आम्ही नेमाडे सरांबरोबर एक-दोन मिटिंग केल्या आणि अखेर नेमाडे सरांनी ‘कोसला’ला संमती दिली. सरांच्या सगळ्या नियमांचे पालन करत आता या चित्रपटाची सुरुवात होत आहे.”

पुढे चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य राठी म्हणाले, “भालचंद्र नेमाडे हे खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यावर आम्ही चित्रपट करतोय. यासाठी मी मेहुल शाह यांचे आभार मानेन की, त्यांनी आम्हाला सहकार्य केले. ही कादंबरी भालचंद्र नेमाडे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. गावातील निरुत्साही वातावरण न आवडणाऱ्या, त्याचा तिटकारा वाटत असतानाही गावासाठी काहीतरी थोर स्वप्न पाहणाऱ्या तरुणाची ही भावनिक कथा आहे. खरंतर चित्रपटाविषयी काही सांगायची गरजच नाही. कारण आपल्यापैकी अनेकांनी ही कादंबरी वाचली आहे. त्यामुळे आता ही कथा प्रेक्षकांना लवकरच पडद्यावर पाहायला मिळणार आहे.’

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A film based on bhalchandra nemade novel kosala has been announced sayaji shinde play lead roll pps