लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील अखेरच्या टप्प्यात आज (२० मे ) मुंबईतील सहा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे अशा १३ मतदारसंघांत मतदान होत आहे. सामान्य लोकांपासून ते राजकीय व कलाविश्वातील मान्यवरांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. परंतु, अशातच आदेश बांदेकर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेला व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. ऐन मतदानाच्या दिवशी पवईतील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिन बंद असल्याने आदेश बांदेकरांनी संताप व्यक्त केला आहे.

आदेश बांदेकर व्हिडीओ शेअर करत सांगतात, “मी आता पवई मतदान केंद्रावर आलो आहे. हा हिरानंदानीसारखा अतिशय सुशिक्षित विभाग आहे. याठिकाणी तुम्ही मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत याचा अंदाज घेऊ शकता. कारण, याठिकाणच्या ५७, ५८ या दोन्ही पोलिंग बूथवरील याद्या बंद झाल्या आहेत. तसेच ईव्हीएम मशिन्स देखील बंद आहेत. हिरानंदानी फाऊंडेशन स्कूल याठिकाणचा हा प्रकार आहे. सकाळपासून सगळ्या मशिन याठिकाणी बंद आहेत. आम्ही एवढा वेळ उभे आहोत पण, कोणीच उत्तर देत नाहीये.”

हेही वाचा : “सुनो द्रौपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आऐंगे”, बॉलिवूड अभिनेत्याने केलेलं अभिवाचन चर्चेत!

“सकाळपासून जे लोक आलेत ते सगळे ३-३ तास रांगेत उभे आहेत. वयस्कर लोक घरी निघून गेले आहेत. इथे कुठल्याच प्रकारची काहीच सोय नाही. आता तीन ते चार तास झाले आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे.” असं सांगत आदेश बांदेकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

“सकाळपासून आम्ही उन्हात उभे आहोत. पण, कोणी उत्तरच देत नाही. तीन तास झाले… आम्हाला मतदान करायचंय पण, आता भरपूर वेळ झाला आहे. आता पुढे अजून किती तास लागतील याची काहीच कल्पना आम्हाला नाही आहे” अशी प्रतिक्रिया आदेश बांदेकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेने दिली आहे. तसेच बांदेकरांसह रांगेत उभ्या असलेल्या इतर मतदारांनी देखील घडल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा : ऐश्वर्या राय बच्चनच्या हाताला नेमकं झालंय तरी काय? अभिनेत्रीवर लवकरच शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती

हेही वाचा : “माझा भारत देश…”, पहिल्यांदा मतदान केल्यावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया; फरहान अख्तरने कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

aadesh bandekar shared post that evm machines are not working
आदेश बांदेकर यांच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया

दरम्यान, आदेश बांदेकरांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया देत लवकरात लवकर याप्रकरणाची दखल घेतली जावी अशी मागणी केली होती. “हीच का लोकशाही ? याला जबाबदार कोण?”, “अत्यंत चुकीचा कारभार”, “सगळीकडे ही समस्या आहे” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.