महाराष्ट्राचे लाडके भावजी म्हणून आदेश बांदेकर यांना ओळखलं जातं. गेली अनेक वर्षे सातत्याने ते ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका निभावत आहे. अभिनेते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांनी नुकताच प्रवासादरम्यान आलेला एक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आदेश बांदेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर महामार्गावर प्रवास करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. “वाई मुंबई प्रवास सुरू असताना खंबाटकी बोगद्यामध्ये १ तास अडकून राहणं…ही वेळ कोणावरच येऊ नये… पुन्हा प्रवास सुरू केल्याबद्दल खंबाटकी परिसर पोलीस आणि क्रेन चालकांचे धन्यवाद” असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात…
आदेश बांदेकर सांगतात, “हा भला मोठा कंटनेर खंबाटकी घाटातील बोगद्यामध्ये अडकला आहे. या एका कंटनेरमुळे संपूर्ण बोगद्यात ट्राफिक झालं असून सगळ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास होत आहे. त्या चालकाने कोणताही विचार न करता बोगद्यापेक्षा मोठा आकाराचा चालवून या मार्गाने प्रवास केला. त्याच्या चुकीमुळे सगळ्या प्रवाशांना अडचणींना सामोरं जावं लागलं. असंख्य प्रवासी बोगद्यात अडकून पडले. पण, खऱ्या अर्थाने पोलिसांचे आभार मानले पाहिजेत. कारण, पोलीस व काही प्रवासी या सगळ्यांनी मिळून तो कंटनेर बाहेर काढला.”
“एकीकडे बोगद्यात कंटनेरमुळे अडचणी निर्माण झाल्या असताना दुसरीकडे बोगद्याच्या प्रवेशाद्वारसमोर आणखी एक कंटनेर उलटला होता. क्रेनच्या साहाय्याने त्या कंटनेरला बाजूला हटवण्यात आलं. हे असेच अपघात होत राहिले, तर पाठीमागून येणारी एखादी रुग्णवाहिका अडकून यामुळे नाहक बळी जाऊ शकतो. देव या चालकांना सुबुद्धी देवो!” असं आदेश बांदेकरांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
हेही वाचा : “तिच्या आजाराविषयी…”, पूनम पांडेंच्या निधनावर संभावना सेठने व्यक्त केलं दु:ख
दरम्यान, बांदेकरांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत आपलं मत मांडलं आहे. एका युजरने या व्हिडीओवर, “बोगद्याच्या आधी जर किती उंचीचे वाहन नेता येईल याचा बोर्ड लावला तर काम सोपे होईल.” अशी कमेंट केली आहे. तर, आणखी एका युजरने, “आजकाल असे प्रकार वाढले आहेत अशी प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिली आहे.”