‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाद्वारे घराघरात ‘भावोजी’ अशी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे आदेश बांदेकर. अभिनेते-सुत्रसंचालक म्हणून ते कायमच चर्चेत असतात. नुकतंच आदेश बांदेकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकरने झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी सुचित्रा बांदेकरांनी आदेश बांदेकरांबद्दल खुलासा केला आहे.
आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर हे मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक जोडपं. सुचित्रा यांच्या घरून आदेश आणि त्यांच्या प्रेमाला विरोध असल्यामुळे त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. सुचित्रा बांदेकर यांनी बऱ्याच वर्षांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्या लवकरच दोन चित्रपटात झळकणार आहेत. यावेळी त्यांना तुम्ही शूटींगला गेल्यावर आदेश बांदेकर घरी काय करतात? असे विचारण्यात आले. त्यावर त्यांनी मजेशीर उत्तर दिले.
आणखी वाचा : “आज शेवटचा भाग चित्रीत झाला अन्…” आदेश बांदेकरांच्या लेकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“माझे ‘झिम्मा २’ आणि ‘बाईपण भारी देवा’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे माझी चर्चा तर रंगणार आहे आणि बातमीही गाजणार” असे सुचित्रा बांदेकर यांनी सांगितले. यानंतर आदेश बांदेकरांना तुमची बातमी काय असे विचारले असता ते म्हणाले, “माझी कोणतीही बातमी नाही. मी वेळच्या वेळी प्रत्येक चित्रपटासाठी तिला तिच्या शूटींगला सोडायला जाणार आणि तिला घरी परत घेऊन येणार आहे. यात मी कुठेही खंड पडू देणार नाही. हीच बातमी आहे.”
त्यावर सुचित्रा बांदेकरांनी “मी शूटींग करत असताना हा घर सांभाळणार”, असे म्हटले. यावर उत्तर देताना आदेश भावोजींनी “हीच सर्वच शूटींग परदेशात असणार आहे. मी इथेच देशात फिरत असणार आहे”, असे सांगितले.
आणखी वाचा : “मला उद्धव ठाकरेंनी…” आदेश बांदेकरांनी सांगितला सिद्धीविनायक मंदिराच्या अध्यक्षपदाचा ‘तो’ किस्सा
दरम्यान आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर हे दोघेही त्यांच्या आगामी कामात व्यस्त आहेत. आदेश बांदेकर हे सध्या ‘होम मिनिस्टर’च्या शूटींगमध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे सुचित्रा बांदेकर हे त्यांच्या आगामी चित्रपटांचे शूटींग करत आहेत.