मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारे अभिनेते म्हणजेच महेश कोठारे. बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड असल्याने बालकलाकार म्हणून त्यांनी ‘राजा और रंक’, ‘छोटा भाई’, ‘मेरे लाल’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर काही काळाने त्यांनी त्यांची वाटचाल मराठी सिनेसृष्टीकडे वळवली.
उत्कृष्ट अभिनेत्याबरोबरच निर्माता आणि दिग्दर्शकाचीही धुरा सांभाळणारे महेश कोठारे यांनी मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला एक चित्रपटासाठी ऑफर दिली होती. पण आमिरने महेश कोठारेंची ऑफर नाकारली. याबद्दलचा किस्सा त्यांनी एका मुलाखतीत सांगितला आहे.
हेही वाचा… न कळवताच अशोक सराफांना चित्रपटातून काढलं; महेश कोठारेंनी दिली ‘त्या’ चुकीची कबूली; म्हणाले…
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत महेश कोठारे म्हणाले, ‘लो मै आ गया’ या चित्रपटात मला आमिर खानला घ्यायचं होतं. मी त्याला भेटलो आणि त्याला माझा ‘मासूम’ चित्रपट दाखवला, त्याला तो आवडला. यावर तो म्हणाला, की आण तुझी स्क्रिप्ट, आपण बघूया काय करायचं ते. त्याचवेळी त्याचा ‘राजा हिंदुस्थानी’ चित्रपट रीलिज होत होता. मी त्यावेळेला नेमका सेन्सर बोर्डवर होतो. त्याला ते कळलं. तेव्हा तो मला म्हणाला, “महेशजी मेरा किसिंग सीन कट नही होना चाहिए, आप देखीये ना जरा.” मी म्हटलं मी प्रयत्न करतो आणि मी माझ्या शैलीने सेन्सर बोर्डवर असलेल्या दुसऱ्या लोकांना त्यासाठी पटवलं.”
महेश कोठारे पुढे म्हणाले, “त्यानंतर दोन दिवसांनी आम्ही भेटलो. तो एका चित्रपटाच्या सेटवर मेकअप रूममधे होता. तो मला भेटला आणि म्हणाला, महेश मला नाही वाटत की मी हे करू शकेन. मी म्हटलं, अरे मी या चित्रपटासाठी सगळी तयारी केली होती. यावर तो म्हणाला “मी हा चित्रपट नाही करू शकणार”
हेही वाचा… “मी बोल्ड सीन करायला अगदीच तयार…”, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ फेम मृणाल दुसानिसचं वक्तव्य
“तेव्हा मग माझ्या डोक्यात वेड्यासारखा विचार आला की तू नाही तर मी दुसऱ्याला घेऊन चित्रपट बनवेन. ते चुकलं माझं. मी त्याचं ऐकायला पाहिजे होतं. खरंतर तेव्हा त्याने मला एक सल्ला दिला होता. तो म्हणाला होता की, हे स्क्रिप्ट असच्या असं करू नकोस. हवतर मी तुला मदत करतो. पण मी त्याचं ऐकलं नाही. मी त्याला म्हटलं, जर आपण यावर काम करत नाही आहोत, तर चर्चा नको.”महेश कोठारे असंही म्हणाले.