Payal Jadhav on Suraj Chavan: सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ सिनेमा हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटातसूरज चव्हाणसह अनेक लोकप्रिय कलाकार दिसणार आहेत.

‘बिग बॉस मराठी ५’ व्या पर्वात सूरज चव्हाणने सर्वांची मने जिंकली होती. त्याने हा या पाचव्या पर्वाची ट्रॉफी जिंकली होती. या शोनंतर केदार शिंदेंनी सुरजची प्रमुख भूमिका असेलला झापुक झुपूक सिनेमा करणार असल्याचे घोषित केले होते. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ‘अबीर गुलाल’ फेम अभिनेत्री पायल जाधवदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

माझ्या सख्ख्या भावाचं…

अभिनेत्री पायल जाधवने ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सुरजच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. आता तिने एका वक्तव्य केले आहे. ‘रत्ना मराठी मीडिया’ने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पायल जाधव ‘झापुक झुपूक’ चित्रपटातील तिच्या भूमिकेविषयी बोलताना दिसत आहे. पायल म्हणाली, “मी बिग बॉसच्या घरात सूरजला राखी बांधली होती. असं झालं होतं की आम्हाला सांगितलं होतं की ११ वाजता बिग बॉसच्या घरात जायचं आहे, तर विचार करून घ्या. मालिका चालू होती, त्यामुळे बिग बॉस जास्त बघायला मिळत नव्हतं. आम्ही जाणार होतो, त्याच्या दोन दिवसानंतर रक्षाबंधन होतं. माझ्या सख्ख्या भावाचं नावसुद्धा सूरज आहे. माझी रडारड सुरू होती की असं पहिलं रक्षाबंधन आहे की मी माझ्या भावाला राखी बांधू शकत नाही. त्यावर माझा नवरा मला म्हणाला की सूरज तुझ्याच गावचा आहे, तुझ्याच जवळचा आहे, आपल्याच पट्ट्यातला आहे. मग त्याला राखी बांध. मी त्याला म्हटले की हो चालेल, बांधते. बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर मी त्याला राखी बांधली. मी वळले आणि त्याने नमस्कार केला.”

पायल पुढे म्हणाली, “तो माणूसच इतका गोड आहे इथे असलेल्या सगळ्या लोकांपेक्षा मी सगळ्यात जास्त नशीबवान आहे की कलाकार म्हणून मी सूरज चव्हाणच्या बहिणीचं पात्र साकारलं. छान वाटतंय की असं काहीतरी पात्र करता आलं. हा खूप वेगळा अनुभव आहे”, असे म्हणत अभिनेत्रीने तिचा आनंद व्यक्त केला.

‘झापुक झुपूक’ या चित्रपटात सूरज चव्हाण, जुई भागवत यांच्याबरोबरच इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी असे अनेक लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सूरजचे निरागस आणि रौद्र अशी दोन्ही रूपे ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहेत. ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.