मराठी मालिका विश्व गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिज्ञा भावेला ओळखलं जातं. आजवर तिने ‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’, ‘तू तेव्हा तशी’, ‘रंग माझा वेगळा’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे. छोट्या पडद्यावरच्या बहुतांश मालिकांमध्ये अभिज्ञाने खलनायिकेच्या दमदार भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. नुकतीच तिने प्रसिद्ध निर्मात्या अमृता राव यांच्या मुलाखतीला उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्रीने मराठी इंडस्ट्रीबद्दल आपलं स्पष्ट मत मांडलं.

अभिज्ञा म्हणाली, “साऊथमध्ये मराठी इंडस्ट्रीचा विषय का काढला जात नाही? मराठीत आपल्याकडे अनेक सुंदर संकल्पना आहेत, इतके चांगले कलाकार आहेत… विषय आहेत, माझ्यामते देशातली प्रत्येक इंडस्ट्री मराठी कलाकारांचं कौतुक करते. मराठी कलाकार म्हटलं अशी कॉलर टाइट असते. पण, आज जेव्हा मला हिंदीमधून कामासाठी कॉल येतात तेव्हा मला बोललं जातं की, मॅम आमचं बजेट एवढं नाहीये. कारण, त्यांना माहितीये की, मराठी कलाकार नेहमी पैशांपेक्षा जास्त प्राधान्य कलेला देतात.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “आज जर प्रेक्षक म्हणून तुम्ही फक्त साऊथ सिनेमे पाहाताय….मग, तो सिनेमा कसाही असूदेत साऊथचे सिनेमे पाहायला सगळेजण जातात. पण, या सगळ्यात मराठी सिनेमांचं बुकिंगचं तुम्ही केलं नाहीत तर कसं होईल? मराठी सिनेमांना ५०० रुपये कोण देणार असा विचार तुम्ही केलात, तर मराठी माणूस म्हणून आपण प्रगती कशी करणार? मला असं वाटतं, मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे, तुम्ही मराठीत बोला यापेक्षा पुढे जाऊन सर्वात आधी प्रेक्षकांनी मराठी सिनेमा पाहिला पाहिजे. त्यानंतर या सगळ्या गोष्टी येतात. जर तुम्हाला तुमच्या इंडस्ट्रीत काय सुरूये, तुमची लोक काय करत आहेत याचं कौतुक नाहीये मग मी इतरांकडून काय अपेक्षा करणार? एक निर्माता, दिग्दर्शक म्हणून तुम्हाला मराठी कलाकारांचं कौतुक नाहीये पण, त्यापेक्षा दहा पट पैसे देऊन तुम्ही एखादा हिंदी चेहरा घेऊन येता…तर हे नक्की काय सुरूये असा विचार मनात येतो.”

“मला असं खूप वाटतं, कदाचित माझं हे विधान खूप वेगळं असावं. पण, मला असे खूप अनुभव आलेत की, आपली माणसं आपल्याला खाली खेचतात. आपल्या माणसांना आपली प्रगती बघवत नाही ते लोक आपल्याच फसवतात.” असं परखड मत अभिज्ञा भावेने मांडलं आहे.

Story img Loader